चंद्रपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पदभार स्वीकारला

चंद्रपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पदभार स्वीकारला

चंद्रपूर दि. ११ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्याचे ३१ वे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने आज मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास रुजू झाले. यापूर्वी जलस्वराज्यचे प्रकल्प संचालक या पदावर ते मुंबई येथे कार्यरत होते. २०१० च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत.
     मावळते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या जागी ते रुजू झाले आहेत.
२०१० च्या तुकडीचे सनदी अधिकारी असणारे अजय गुल्हाने यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा व विधान परिषद निवडणूक काळात यवतमाळ येथे एक वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे. आज रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कोरोना संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या. आरोग्य यंत्रणेसोबत देखील त्यांनी चर्चा केली.
      एमएसस्सी हॉर्टीकल्चर हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले श्री. गुल्हाने यांनी १९९४ मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावरून आपल्या प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, जिल्हा वर्धा. उपविभागीय अधिकारी वर्धा, उपजिल्हाधिकारी महसूल नागपूर, नगर दंडाधिकारी नागपूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना अभियान, ऊर्जामंत्री यांचे स्वीय सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तर मुंबई येथे जलस्वराज्यचे प्रकल्प संचालक म्हणून मुंबई येथे ते कार्यरत होते.
       प्रशासनातील उत्तम कार्यासाठी त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उत्कृष्ट अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथून दिला जाणारा प्रतिष्ठीत स्कॉच अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, स्कॉच अवार्ड ऑफ मेरीट त्यांना प्रशासनातील योगदानासाठी मिळाला आहे.याशिवाय ई -गव्हर्नन्समध्ये राज्य शासनाकडून देखील त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.
 अजय गुल्हाने विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट जलतरणपटू व धावपटू म्हणूनही महाविद्यालयीन जीवनात प्राविण्य प्राप्त आहेत. आज ते रुजू झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे ,उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र सूरपाम व अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.