औरंगाबाद मधील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन याबाबत नुकतंच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली
11 मार्च ते 04 अप्रैल पर्यत लॉकडाउन
औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या 11 मार्चपासून औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन याबाबत नुकतंच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा औरंगाबाद चे जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या 11 मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे.
औरंगाबाद मध्ये काय सुरु, काय बंद?
या लॉकडाऊनसाठी लवकरच नवी नियमावली जारी केली जाणार आहे. यानुसार राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही.
रात्री 9 पर्यंत हॉटेल सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री 11 पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
औरंगाबादच्या लॉकडाऊनबाबत आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढत होत आहे. औरंगाबादमध्ये काल दिवसभरात तब्बल 440 कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 52 हजार 543 वर पोहोचला आहे. औरंगाबादेत आतापर्यंत 48 हजार 295 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1289 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.