Maharashtra Budget 2021 : महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट ,काय महाग काय स्वस्त? शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास #MaharashtraSarkar #महाराष्ट्रबजट

Maharashtra Budget 2021 : महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट,

काय महाग काय स्वस्त?

शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास

मुंबई, 08 मार्च : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प 2021 सादर केलाय. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात. 

देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅट 60 वरुन 65 टक्के करण्यात आलाय. तर सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅटचा दर 35 % वरून 40% टक्के करण्यात आलाय. देशी बनावटीच्या मद्याचे उत्पादन शुल्क निर्मिती मूल्याच्या 220% किंवा 187 रुपये राहणार आहे.

शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास

तसेच शाळकरी मुलींना बसने मोफत प्रवास करता येणार आहे. घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलतही देण्यात आलीय. 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे. आरोग्य सेवेसाठी 7 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.


महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अजित पवारांची मोठी घोषणा

महिला दिनाच्या दिवशी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. यापैकी गृहलक्ष्मी या योजनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या योजनेनुसार राज्यात कोणतेही घर विकत घेतले जाईल तेव्हा त्या घराची नोंदणी महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाईल. 1 एप्रिल 2021 पासून या योजनेची अंमलबजावणी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले. आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय.

जाणून घ्या, काय स्वस्त आणि काय महाग?

-  3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा.

-  ग्रामीण विद्यार्थिंनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना, शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देणार.

- मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी “तेजस्विनी योजनेत” आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देणार.

-  महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय.

-  तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना.

-  विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींकरिता “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना” राबविण्याचे प्रस्तावित.

- मद्यावरील व्हॅटमध्ये 60 वरुन 65% वाढ झाल्यानं दारू महागणार

आरोग्य सेवा

-आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल.

- महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार, त्यापैकी 800 कोटी रुपये यावर्षी.

- कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात 150 रूग्णालयांमध्ये सुविधा.

- सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार.

- सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955 कोटी 29 लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1 हजार 941 कोटी 64 लाख रुपये तरतूद.