आजपासून विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये : जिल्हाधिकारी खेमनार यांचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यूला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद


-  पालकमंत्री विजय वडेट्टीवार उद्या घेणार आढावा

  -    जिल्ह्यांमध्ये एकाही पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद नाही

- विदेशातून आलेले एकूण 31 नागरिक निगराणी मध्ये

-  विदेशातून आलेल्या आणखी 7 नागरिकांची नोंद

-  निगराणीतील 12 नागरिक धोक्याबाहेर

-  पुणे -मुंबईतून आलेल्या प्रवाशांनी 14 दिवस घरी थांबण्याचे आदेश

-  चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सीमावरती भागामध्ये नाका-बंदी

-  आंतरराज्य व चंद्रपूर शहराबाहेर जाणाऱ्या सर्व बसेस बंद

-  31 पर्यंत देशभरातील रेल्वे बंद, चंद्रपूर वरूनही गाड्या जाणार नाहीत

-  उपलब्ध सर्व फॉगिंग मशीन दुरुस्त ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश

-  आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी वरिष्ठांची बैठक

-  गरज पडल्यास वन अकादमीच्या अद्यावत कक्षांचा वापर करणार

-   वयस्क नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन

-   कोरोना संसर्गाची माहिती लपविणाऱ्या खाजगी डॉक्टरांवर कारवाई करणार

-   नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या आजाराची माहिती देण्याचे आवाहन

-  सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश

-  फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकाने उघडी राहणार

-  होम कॉरेन्टाईन नागरिकांना आरोग्य कर्मचारी व बीट जमादार रोज भेट देणार

-  जिल्हा यंत्रणेकडून विचारपूस करणाऱ्या दूरध्वनीला प्रतिसाद देण्याचे आवाहन

-  व्हेंटिलेटर,मास्क, सॅनीटायझर याची मुबलक उपलब्धता करणार

-  सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा गरजेनुसार घेणार

-  जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत

चंद्रपूर, दि. 22 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशातून आलेल्या एका रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. आता निगराणीत असणाऱ्या विदेशातून आलेल्या रुग्णांची संख्या 31 आहे. 12 नागरिकांना 14 दिवसांचा अवधी झाल्यामुळे निगराणी बाहेर करण्यात आले आहे. आज झालेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तथापि पुढील आदेश येईपर्यंत जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
        जनता कर्फ्यूला आज मिळालेला प्रतिसादासंदर्भात आढावा घेताना त्यांनी आज सायंकाळी उच्चस्तरीय आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गेहलोत, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत असणारी आरोग्य यंत्रणेकडून औषध उपलब्धता व संभाव्य परिस्थितीत लागणारे उपकरणे औषधी यासंदर्भातल्या आढावा घेण्यात आला.

उद्या सकाळी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. उद्या सकाळी ते विविध ठिकाणी पाहणी करणार आहे.

दरम्यान आज जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कालपर्यंत 44 तर आज 31 विदेशातून आलेले नागरिक निगराणी मध्ये आहे. यामध्ये आज बेल्जियम वरून आलेल्या एका नागरिकाची भर पडली आहे. त्यांची तपासणी सुरू आहे. विदेशातून आलेल्या यापूर्वीच्या 12 लोकांनी 14 दिवस तपासणी पूर्ण केली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तथापि पुणे मुंबई येथून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुढील 14 दिवस घरीच आपल्या कुटुंबापासून देखील अलिप्त राहावे, आरोग्याबाबत कोणतीही शंका असल्यास अधिक माहितीसाठी व मदतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय 07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226, चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 1077 या प्रमुख  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

उद्यापासून देखील पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यामध्ये 144 कलम कायम लागू राहणार आहे. जमावबंदी लागू असल्यामुळे आवश्यकता असल्याशिवाय कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.खासगी डॉक्टरांनी कोरोना संदर्भात कोणताही रुग्ण त्यांच्याकडे दाखल झाल्यास आरोग्य यंत्रणेची संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासंदर्भातली कोणतीही माहिती लपवून ठेवल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. संपर्कासाठी 10 नवीन लाईन घेतलेल्या असून वृत्तपत्रातून वारंवार दिल्या जाणाऱ्या हेल्पलाइन नंबरवर मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान सर्व विश्रामगृहावर खानपानाची व्यवस्था ,तसेच गरज पडल्यास रुग्ण दाखल करण्यासाठी व्यवस्था अद्यावत ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. पुढील काळामध्ये जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एकाच वेळी फवारणी करण्यासंदर्भात ही कार्यवाही केली जाऊ शकते .त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत यांच्या ताब्यात असणाऱ्या फवारणी यंत्रणा, फॉगिंग मशीन अद्ययावत ठेवण्याची, दुरुस्त ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना परिस्थितीची लढतांना रक्तपेढीमध्ये कमतरता येऊ नये यासाठी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन देखील जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.
     31 मार्च पर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी प्रवास करू नये.एसटी बस, रेल्वे बंद करण्यात आलेल्या आहे. अत्यावश्यक असल्यास खाजगी वाहनाने प्रवास करता येईल. मात्र या सर्व खाजगी वाहनांची तपासणी जिल्ह्याच्या प्रत्येक तपासणी नाक्यावर काटेकोरपणे केली जाणार आहे. घरातल्या कुठल्याही रुग्णाची माहिती लपवण्यात येऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भात लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली.

सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, परिचारिका व कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध होणार :

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत शासकीय,महापालिका,नगरपालिका, आर्म फोर्सेस (मेडिकल कॉर्प) मधून सेवानिवृत्त झालेले. परंतु,आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून घेण्याबाबत ऑनलाइन अर्जाद्वारे इच्छुकता मागविता येणार आहे..

तेलंगणा सरकारद्वारे सीमेवर प्रतिबंध :

तेलंगणा राज्यात महाराष्ट्रातील अनेक वाहने जात असतात. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच, इतर राज्यातील वाहने तेलंगणा राज्यात येऊ नये यासाठी तेलंगणा सरकारद्वारे सीमेवर प्रतिबंध केला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच सिमेंट कंपनी  व इतर ट्रान्सपोर्ट एजन्सींनी तेलंगणा राज्याच्या दिशेने प्रवास न करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांनी द्यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत.