आजपासून चंद्रपुर जिल्ह्यात 'मूल्यवर्धन जिल्हा मेळावा'


चंद्रपुर ,दि.12 मार्च : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत होत असलेले परिवर्तन  सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी जिल्हास्तरावर मूल्यवर्धन मेळाव्याचे आयोजन दिनांक 12 ते 14 मार्च 2020 या कालावधीत चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

12 मार्चला शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांच्या उपस्थितीत मेळाव्याची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहीली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी जानेवारी 2016 पासून सुरू आहे.

या 'मुल्यवर्धन' जिल्हा मेळाव्याच्या अनुषंगाने दिनांक 12 मार्च 2020 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे सकाळी 10.30 वाजता विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. तसेच मूल्यवर्धन कार्यक्रमासंदर्भात दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. या मूल्यवर्धन मेळाव्यास नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

अशी आहे मूल्यवर्धन संकल्पना:

शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिलीपासून रुजविणे, बालस्नेही व विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने आनंददायी वातावरणामध्ये सहयोगी अध्ययन व ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पद्धतीचा वापर करून,विविध कृती, वर्ग उपक्रम आणि शालेय उपक्रम याद्वारे सातत्याने आणि सुनियोजित रीतीने संधी उपलब्ध करून देणे ही मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना आहे.