रविवारी जनतेचा कर्फ्यू पाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
-चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
-नवीन कोणत्या ही रुग्णाची जिल्ह्यामध्ये नोंद नाही
-पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा
-विदेशातून आलेले 37 नागरिक अजूनही होम कॉरेनटाइन
- लग्नसमारंभाच्या आयोजनावर पूर्णपणे बंद। -फक्त शनिवारी 11 ते 6 दुकाने उघडी राहतील
- रेस्टॉरंट हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा व होम डिलिव्हरीला परवानगी
- एमआयडीसी व अन्य ठिकाणच्या उद्योगांना बंद ठेवण्याचे आदेश
-जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उद्योग सुरू राहतील
- नागरिकांना नियमित जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल
- जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने नियमितपणे उघडे राहतील
-हॉटेल्समध्ये जेवणावळी नाहीत फक्त पार्सल सुविधा
चंद्रपूर दि २० मार्च : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन आता सक्तीने अनेक क्षेत्रात कार्यवाही करत आहे. आज पासून 144 कलम जिल्ह्यात लागली असून शनिवारी रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरीकांचा कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी सर्वांनी घराबाहेर पडूच नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवारी कोणत्याही रुग्णांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत एकही कोरोना पॉझिटिव रूग्ण नसून कालपर्यंत असणाऱ्या 45 विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आज ८ नागरिकांचे होमकॉरेन्टाईन संपुष्टात आले. जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी आज स्वतः रेल्वे स्थानकाची पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी ऑटो चालकांची संवाद साधला. त्यांना मास्क वाटप केले. या कठीण परिस्थितीत ग्राहकांची सेवा करत असल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांना स्वच्छता राखून प्रशासनाला माहिती पुरविण्याची ही त्यांनी ऑटो चालकांना सांगितले.
दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन इतर बहुजन समाज कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात जमावबंदी लागू केल्यानंतर सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने पुढील काही दिवस अतिशय कठोरपणे ही मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये ,तथापि, या काळामध्ये नागरिकांनी घरीच राहणे सोयीचे राहील असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसात अकरा ते सहा पर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरू होती. उद्या शनिवार पर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरू राहतील. मात्र रविवार सकाळपासून पुढील आदेश येईपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाने आज दिले आहेत.
याकाळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांना मात्र नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिकचा साठा करण्याची घाई करू नये.सर्वांना जजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल अशा पद्धतीने सर्व किराणा दुकान दूध केंद्र पेट्रोल पंप व अन्य जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे केंद्र सुरू राहील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे,मुंबई व अन्य भागातून येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांनी घाबरून न जाता या काळामध्ये घरीच अलिप्त तेच राहणे योग्य ठरेल सामान्य नागरिकांना आपल्या आरोग्य संदर्भात कोणतीही भीती वाटल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील ०७१७२-२७०६६९ जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये ०७१७२-२६१२२६ व चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, औषधी प्रशासन विभागाने चिमूर मधील एक व चंद्रपूर शहरातील चार ठिकाणी महागड्या दराने सॅनीटायझर विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. पुढील काळात अशा पद्धतीचे वाढीव दरामध्ये करताना कोणी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा दुकानदारांची तक्रार औषधी व अन्न प्रशासन विभागाकडे करावी, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.
शहरांमध्ये रस्त्याच्याकडेला असणारे व रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये खाद्य तयार करणाऱ्या संस्था बंदमधून वगळण्यात आल्या आहेत.मात्र या ठिकाणावरून केवळ पार्सल सुविधा किंवा होम डिलेवरी करता येईल. याठिकाणी ग्राहकांना जेवण देता येणार नाही. असे आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा देण्यासाठी हॉटेल्स रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची मुबा देण्यात आली आहे.