कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने सिरोंचा येथील होणाऱ्या उर्स /यात्रेबाब जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेश निर्गमित


गडचिरोली 11मार्च : सिरोंचा येथे होऊ घातलेल्या हजरत वली हैदरशाह रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रा व कव्वालीचा कार्यक्रम रद्द करणेबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत उर्स समितीने सदर उर्स जत्रेबाबत लोकांची गर्दी कमी करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश निर्गमित करुन प्रशासनाला व संबंधित समितीला तसेच येणाऱ्या भाविकांना कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आदेश निर्गमित केले आहेत.
आदेश-
ज्याअर्थी, उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये, तहसिलदार सिरोंचा यांनी दिनांक १२/०३/२०२० ते दिनांक १४/०३/२०२० दरम्यान मौजा सिरोंचा, ता. सिरोंचा येथे होऊ घातलेल्या हजरत वली हैदरशाह रहेमतुल्लाह अल्लेह बाबा उर्स जत्रा व कव्वालीचा कार्यक्रम रात्री १०.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यत अध्यक्ष, मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमेटी सिरोंचा यांनी केली असल्याचे कळविले आहे.

ज्याअर्थी, आणि कोरोना विषाणु संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर युनिसेफ, केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे निर्देशाप्रमाणे धार्मीक बाबी वगळता अन्य कार्यक्रमास, संसर्गाचा धोका टळेपर्यत स्थगिती देण्याचे आवाहन करण्यात आले असता उर्स आयोजक कमेटीने सर्वसंमतीने याबाबत प्रशासनास सहकार्य करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी मी, दीपक सिंगला, जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त ठिकाणी/परिसरात खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.

१. उपरोक्त उर्स यात्रेत उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे इत्यादी आवश्यक धार्मिक बाबी वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम करता येणार नाही.
२ . यात्रा, दुकाने, आकाश पाळणे लावता येणार नाही.
३. स्वागत समारंभ, कव्वाली, अन्नदान यासारखे कार्यक्रम घेता येणार नाही.
४ . लोकांच्या जमावामुळे संसर्गाचा धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाही.
५ . कोरोना व्हायरसचा (nCov) संसर्ग होणार नाही याची अध्यक्ष, मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमेटी सिरोंचा यांनी खबरदारी घेण्यात यावी
यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या येथे उर्स करिता येणाऱ्या भाविकांनी खबरदारीचा उपाय म्हणून येऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामध्ये शेजारील तेलंगणा, छत्तीसगड राज्य तसेच महाराष्ट्रातील जवळील सर्व जिल्हे येथील प्रशासनालाही आवाहन करण्यात येत आहे, की तिथून येणार्‍या भाविकांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी याबाबत कळविण्यात यावे.