महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनच्या काळात 196 सायबर गुन्हे दाखल , आतापर्यंत 37 आरोपींना अटक झाली , सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर पोलिसांचे बारीक लक्ष


मुंबई, दि.14 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने 196 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहे. हा विभाग टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.  राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 196 गुन्हे 13 एप्रिल 2020 पर्यंत दाखल झाले आहेत. यातील आठ गुन्हे अदखलपात्र आहेत. या गुन्ह्यांमधे आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 93 गुन्हे दाखल झाले आहेत.
आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 61 गुन्हे तर टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 2 गुन्हे व अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी 27 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 37 आरोपींना अटक झाली आहे.