यवतमाळ शहरातील 33 हजार नागरिकांना गृह विलगीकरणाचा शिक्का ,आयसोलेशन वॉर्डातील चार जणांना सुट्टी ,78 पैकी 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


     
 India Fights Corona
 
यवतमाळ, दि.10 अप्रैल (जिमाका) : आयसोलेशन वॉर्डातील आठ पॉझेटिव्ह रुग्ण यवतमाळ शहरातील जाफर नगर, मेमन सोसायटी आणि इंदिरा नगर येथे वावरल्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र प्रशासनाने प्रतिबंधित केले आहे. तसेच या क्षेत्राच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागात असलेल्या एकूण 33045 लोकांचे गृह विलगीकरण करण्यात असून त्यांच्या हातावर शिक्का मारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. 
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या चार जणांना सुट्टी देण्यात आली आहे. यापैकी तीन जण गृह विलगीकरणात तर एक जण संस्थात्मक विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली पुढील 14 दिवस राहणार आहे. गुरुवारी नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या 78 जणांच्या नमुन्यापैकी 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तरीसुध्दा यातील तीन जणांचे नमुने व एका नागरिकाच्या नमुन्याचे परत निदान करण्यासाठी नागपूरला पाठविण्यात येणार आहे.
 सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात एकूण 111 जण भरती आहेत. यात आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह असून यापैकी सात जण बाहेरच्या राज्यातील आहेत तर एक जण स्थानिक आहे. या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. याच शोधमोहिमेच्या अनुषंगाने गत 24 तासात 66 लोकांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले. 
 भरती असलेल्या 78 लोकांचे नमुने गुरवारी नागपूर येथे चाचणीकरीता पाठविण्यात आले होते. यापैकी 31 जणांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले तर शुक्रवारी एकूण 74 लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविले आहेत. पॉझेटिव्ह रिपोर्ट असलेले नागरिक यवतमाळ शहरातील जाफर नगर, मेमन सोसायटी आणि इंदिरा नगर या भागात वावरल्यामुळे येथील 7078 घरांमधील एकूण 33045 नागरिकांचा सर्वे आरोग्य विभागाच्या मार्फत दररोज सुरू आहे. यात नागरिकांना ताप, खोकला, कोव्हिड - 19 ची लक्षणे आदी बाबी तपासण्यात येत आहे. यापैकी गुरूवारच्या सर्वेक्षणात 2 जणांना ताप व 33 जणांना खोकला असल्याचे निदर्शनास आले. तर शुक्रवारी करण्यात आलेल्या सर्वेमध्ये 14 जणांना ताप आणि 25 जणांना खोकला निदर्शनास आला. यांचे नमुनेसुध्दा 20-20 च्या रँडम पध्दतीने तपासणीसाठी पाठविण्यात येईल.
शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेकरीता आरोग्य विभागाच्या एकूण 96 टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक भागासाठी आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येकी एक जिल्हास्तरीय वैद्यकीय अधिकारी व 15 सुपरव्हायझर कार्यरत आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली हा सर्वे सुरू आहे. या भागात जिल्हा प्रशासनाने मोठ्या संख्येने पोलिस तैनात केले आहे.
 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एकूण 67 आहे. यात धामणगाव रोडवरील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहात 23 जण तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात 44 जण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहे. 
 पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेसमोर यावे व आरोग्य तपासणी करून घ्यावी. यासाठी 07232 - 240720, 07232 - 239515, टोल फ्री क्रमांक 104 उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोव्हिड - 19 या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे नागरिकांची पालन करावे. आपल्या घरातच राहून आपण या संकटाचा मुकाबला करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कारणास्तव घराबाहेर असल्यास एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग राखावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.