अन्य जिल्ह्यातून चंद्रपुर जिल्ह्यात आलेल्यांना परवानगी व तपासणी शिवाय प्रवेश नाही : जिल्हाधिकारी, धार्मिक कार्यक्रम ,सण,उत्सव घरातच साजरे करा


अन्य जिल्ह्यातून आलेल्यांना

परवानगी व तपासणी शिवाय प्रवेश नाही : जिल्हाधिकारी

धार्मिक कार्यक्रम ,सण, उत्सव घरातच साजरे करा

 

Ø  30 एप्रिल पर्यंतच्या लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

Ø  धार्मिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या पोलीस पाटलांवर कारवाई

Ø  जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही

Ø  मास्क व सामाजिक अंतर राखणे अनिवार्य

Ø  कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या जिल्ह्यातून प्रवेश नाहीच

Ø  जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करणार

Ø  मनपा हद्दीमध्ये निर्जंतुकीकरण यंत्रणेला सुरुवात

Ø  नागरिकांनी अनोळखी, आजारी व्यक्तीची  माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी

Ø  विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईं, 260 वाहने जप्त

चंद्रपूर, दि.12 एप्रिल (जिमाका) : देशात राज्यात व लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची वाढ होत आहे. अशा जिल्ह्यांमधून कोणालाही प्रवेश मिळणार नाही. पोलीस व प्रशासनाची परवानगी असल्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अन्य कोणत्याही जिल्ह्यातून व राज्यातून प्रवेश करता येणार नाही. तसेच चंद्रपूरच्या नागरिकांना जाता येणार नाही. येणाऱ्या काळात सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम रद्द करावे. अजयपुर येथे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या पोलीस पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज दिली.

        चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधतांना त्यांनी काल अजयपुर येथे झालेल्या घटनाक्रमाला बद्दल खेद व्यक्त केला. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचे सण उत्सवांचे आयोजन आपल्या स्वतःसाठी व आपल्या परिवारासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने चंद्रपूर शहर किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात कोणीही कार्यक्रम आयोजित करण्याचे धाडस दाखवत असेल तर याबाबत वेगवेगळ्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर माहिती द्यावी. सध्या चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त आहे. पुढील काळात कोणतीही घुसखोरी होणार नाही. अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांना विनाकारण त्याची किंमत चुकवावी लागेल, चुकीच्या पद्धतीने वागू नये, असे विनम्र आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनी देखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान्याचे वितरण तसेच शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. पुढील 30 तारखेपर्यंत आपल्या घरातील कोणीच बाहेर पडणार नाही. याची खबरदारी घरातील ज्येष्ठांनी देखील घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान महानगरपालिकेने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शहराच्या हद्दीत येणाऱ्या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात देखील ही कार्यवाही सुरू केली जाणार आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी व प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. 40 नव्या नागरिकांची नोंद घेण्यात आली. त्यापैकी 32 नागरिकांचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 25 नमुने निगेटिव्ह आले आहे. 7 नमुन्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. जिल्ह्यात  3 हजार 511 नागरिक निगराणीखाली आहेत. आतापर्यंत 14 दिवसांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 23 हजार 381 आहे. 42 नागरिक इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईनमध्ये आहेत.

      जिल्ह्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्या 35 लोकांना अटक करण्यात आली असून 120 नागरिकांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 260 वाहने जप्त करण्यात आली असून लॉकडाऊन संपेपर्यंत परवानगी शिवाय रस्त्यावर वाहने चालविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य कोणतीही प्रतिष्ठाने उघडण्यास बंदी कायम असून नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन काळात घरीच रहावे, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.