नागपूर शहरातुन कोरोनाची मोठी दिलासादायक व सकारात्मक बातमी


लोकतंत्र की आवाज़ , चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क

नागपुरातील आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त

पूर्णपणे बरे होउन घरी परतले 

रुग्णालयातील कर्मचा-यांनी केले अभिनंदन

नागपुर , 12 अप्रैल : नागपूर शहरासाठी मोठी दिलासादायक व सकारात्मक बाब शनिवारी (ता.११) दिसून आली. शहरातील आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीवरून आलेल्या कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याच्या परिवारातील तीन कोरानाबाधित रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होउन घरी परतले. या तीन रुग्णांमध्ये दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे तिनही रुग्णांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले.
शुक्रवार(ता.१०)पासून कोरोनासंदर्भात नागपूर शहराकरिता दिलासादायक माहिती मिळत आहे. शुक्रवारी खामला येथील ४२ वर्षीय व्यक्तीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे सुट्टी देण्यात आली. याच व्यक्तीच्या संपर्कात आलेले त्यांची ५९ वर्षीय आई, ३४ वर्षीय पत्नी आणि १४ वर्षीय मुलगा कोरोनामुक्त झाले आहेत.
१७ मार्च रोजी दिल्ली येथून परतलेल्या खामला येथील ४२ वर्षीय व्यक्तीची २६ मार्च रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. खबरदारी म्हणून या व्यक्तीच्या परिवारातील सर्व सदस्यांची २६ मार्च रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली. २७ मार्च ला सदर रुग्णाची ५९ वर्षीय आई, ३४ वर्षीय पत्नी आणि १४ वर्षीय मुलाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्वरीत तिनही रुग्णांना रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये भरती करून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शनिवारी (ता.११) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, खामला येथील कोरोनाबाधीत असलेल्या रुग्णाला शुक्रवारी (ता.१०) ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. त्याच परिवारातील तीन रुग्णही आज घरी परतत आहेत. विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया या सर्वांना याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांच्या मार्गदर्शनात रुग्णांवर संपूर्ण उपचार करण्यात आला. उपचार करणा-या तज्ज्ञ डॉक्टरांतर्फेही रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे सांगण्यात आले. आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार रुग्णांना सुट्टी देण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण आठ रुग्णांपैकी तीन रुग्ण घरी परतल्याने आता रुग्णालयात ५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर या रुग्णांनाही सुट्टी होण्याची शक्यता आहे.

घाबरून जाउ नका, घरीच राहा ; तीनही रुग्णांचे आवाहन
तीनही रुग्णांनी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, तसेच रुग्णालयातील अन्य सर्व कर्मचा-यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली, त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. कोरोनामुळे कुणीही घाबरून जाउ नये. प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यांचे सर्वांनी पालन करावे. कुणीही घराबाहेर पडू नये, नियमित स्वच्छता पाळावी. ताप, सर्दी, घसादुखी, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता तातडीने उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.