नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ चा परिसर सील :महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश, गौतम नगर परिसरात कोरोनाबाधित आढळल्याने निर्णयलोकतंत्र की आवाज़ ,चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क
नागपुर, 17 एप्रिल (प्रतिनिधि) :
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मंगळवारी झोन अंतर्गत गौतम नगर प्रभाग क्रमांक १० या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील अन्य भागामध्ये होउ नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रभाग १० आणि धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ चा परिसर सील करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार मंगळवारी झोन क्रमांक १० अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग १२ च्या दक्षिण-पूर्वेस गिट्टीखदान पोलिस स्टेशन, दक्षिण-पूर्वेस पारसी सिमेटरी एंट्री पॉईंट, दक्षिणेस पारसी सिमेटरी साउथ पॉईंट, दक्षिण-पश्चिमेस ताज किराणा, पश्चिमेस निर्मल गंगा कॉम्प्लेक्स, पश्चिमेस गिट्टीखदान चौक काटोल रोड, उत्तर-पश्चिमेस वेल्कीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल, उत्तरेस कॅप्स रिजेकन्सी, उत्तर-पूर्वेस श्री रामदेवबाबा टेंम्पल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सर्व सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येता येणार नाही.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.