मुंबई येथील ५३ पत्रकारकोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने, नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार


 

लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क टीम
नागपुर, 20 अप्रैल (प्रतिनिधि): 
मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसार माध्यम क्षेत्रात काम करणा-या प्रतिनिधींना कोविड-१९ चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.
महापौरांच्या पुढाकारातून शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी २१ आणि २२ एप्रिलला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेण्यात येणार आहे. मंगळवारी २१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची सकाळी ९.३० वाजता तर बुधवारी २२ एप्रिलला प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींची चाचणीही सकाळी ९.३० वाजतापासून करण्यात येणार आहे.

नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार दिवस रात्र कार्य करीत आहेत. सर्वत्र कोरोनाचा धोका असतानाही हे प्रतिनिधी जीवाची पर्वा न करता अनेक ठिकाणी जाउन जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत. अशा स्थितीत त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांच्या परिवाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो हॉस्पीटल) जाउन ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.