यवतमाळ जिल्ह्यातील मध्यरात्री मृत्यु झालेल्या 'त्या' व्यक्तिचा रिपोर्ट निगेटिव्ह

  
लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क
   पॉझेटिव्ह असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक
    आयसोलेशन वॉर्डातील 32 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
       यवतमाळ, दि. 11(जिमाका) : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11 एप्रिलच्या मध्यरात्री मृत्यु झालेल्या परसराम राठोड (वय 56) रा. करंजीखेड, ता. महागाव यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
परसराम राठोड यांना तीन - चार दिवसांपासून ताप, खोकला, उलटी आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे 10 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता ते स्वत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाले होते. त्यांचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथे महाविद्यालय प्रशासनाने त्वरीत पाठविले. दरम्यान रिपोर्ट प्राप्त होण्यापूर्वीच 11 एप्रिल रोजी मध्यरात्री 1.45 वाजता त्यांचा मृत्यु झाला.
आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आठ पॉझेटिव्ह रुग्णांपैकी सात जणांची प्रकृती चांगली आहे. तर 62 वर्षीय नागरिकाची प्रकृती स्थीर असली तरी चिंताजनक आहे. सध्या हा रुग्ण व्हेंटीलेटरवर असून त्यांना सुरवातीपासूनच रक्तदाब, लखवा आणि न्युमोनिया आहे. तसेच त्यांना रिनल फेल्युअर (किडनी संबंधित आजार) सुध्दा आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर वेळोवेळी उपचार सुरू आहेत.
सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 158 जण भरती आहेत. गत 24 तासांत 48 जणांना भरती करण्यात आले आहे. नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या रिपोर्टपैकी 32 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहेत. यापैकी सहा नमुने पुर्नतपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार आहे. शनिवारी एकूण 52 जणांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 136 नमुन्यांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहे. तर आतापर्यंत प्राप्त झालेल्या निगेटिव्ह रिपोर्टची संख्या एकूण 170 आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.  
 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एकूण 67 आहे. यात धामणगाव रोडवरील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहात 23 जण तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात 44 जण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहे. गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या जिल्ह्यात 91 आहे.