आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा नंतरच सीईओंची भेट घ्या


कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

चंद्रपूर,दि. 24 जून: गेल्या चार महिन्यांपासून कोरोना आजारापासून सामान्य जनतेला दूर ठेवण्यासाठी झटत असणारे जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आता त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी एक आरोग्यदायी व समाज उपयोगी गळ घातली आहे. मला भेटायचे असेल तर आधी आपल्या फोनवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा असा त्यांचा आग्रह आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दररोज शेकडो अभ्यागत विविध कामे घेऊन येतात यामध्ये शेतकऱ्यांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत आणि कर्मचाऱ्यांनी पासून व्यापाऱ्यांपर्यंत अनेक लोकांचा सहभाग असतो. समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड केल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी त्याचा उपयोगच होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात तर या अॅप वरून एका बाधिताचा  देखील पत्ता लागला आहे. त्यामुळे हे ॲप अँड्रॉइड असणाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेताना अभ्यागत जर अँड्रॉइड फोन धारक असेल तर त्यांच्याकडे आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केलेला असावा, अशी अपेक्षा व्यक्त केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी  जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी  गठित केलेल्या  नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून  जिल्ह्यातील  गावांना जिल्हाधिकारी कार्यालयाची जोडण्यात महत्त्वाची भूमिका  बजावली आहे. त्यांनी केवळ स्वतःसाठीच ही गळ घातली नसून जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन देखील त्यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना केले आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूरचे अधिनस्त सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी तसेच इतर कार्यालय प्रमुख यांची सुद्धा भेट घेताना स्मार्टफोन धारकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आता आवश्यक आहे. याविषयीची माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्यालयाने जारी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिक कर्मचारी  गावातील, क्षेत्रातील अडचणींचे निराकरण करण्याकरिता मुख्यकार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेटी घेतात. कोविड-19 मुळे खबरदारी म्हणून मास्क वापरणे कार्यालयात बंधनकारक केले आहे.तसेच सॅनिटायजर, वॉश बेसिन इत्यादींची व्यवस्था केलेली आहे.

अँड्रॉइड फोन धारकांनी आरोग्य सेतूचा वापर जास्त प्रमाणात करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्तमानपत्रे, सोशल मीडियाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तरीसुद्धा अनेक नागरीक आरोग्य सेतूचा वापर कमी प्रमाणात करतांना दिसत आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, याचा वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.