चंद्रपूर शहरात पहिल्या दिवशी नागरिकांचा लॉकडाऊनला उस्फूर्त प्रतिसाद #ChandrapurCity # LockdownAgainरुग्ण दुप्पटीचा दर वाढावा यासाठी टाळेबंदी :  जिल्हाधिकारी

  तपासणी, चाचणी, अलगीकरण ही त्रिसूत्री राबवणार

  पाहिल्याच दिवशी 350 चाचण्या

  शहरात धडाक्यात स्वच्छता मोहिम सुरू
   17 ते 26 घराबाहेर निघू नका ;नागरिकांना आवाहन

चंद्रपूर, दि. 17 जुलै : चंद्रपूर शहरात अचानक वाढ होत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट करण्यासाठी, तसेच गेल्या काही ही दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या लॉक डाऊनला नागरिकांनी पहिल्या दिवशी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

आज दिवसभरात चंद्रपूर महानगराच्या रस्त्यावर शुकशुकाट होता. यापूर्वीच्या लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी स्वतः पुढे येत प्रशासनाला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी नागरिकांचे आभार मानले आहे.

   चंद्रपूर शहराचा व जिल्ह्याचा कोरोना बाधितांची संख्या दुप्पट होण्याचा सरासरी 17 दिवसांचा दर हा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढल्यामुळे फक्त बारा दिवसांवर आला होता. ही धोक्याची घंटा असून रुग्ण संख्याही 228 च्या वरती गेली आहे. चंद्रपूर संपूर्ण महाराष्ट्रात पहिला जिल्हा आहे, ज्याठिकाणी शून्य मृत्युदर आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस उपचार, तपासणी, आणि अलगीकरण या सूत्रांवर भर दिला जाणार आहे.

  ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्यावर उपचार करणे, बाहेरून आलेल्या नागरिकांना व संशयित नागरिकांच्या चाचण्या घेणे, ज्यांना लक्षणे दिसतात त्यांना अलगीकरणात टाकने, या उपक्रमासाठी हा दहा दिवसांचा बंद पाळण्यात येत आहे.

   कोरोना आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या तीन-चार दिवसात या आजाराचे  लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे 17 ते 26 या काळात कोणीही घराबाहेर पडू नये. घरात कोणालाही लक्षणे दिसल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 97172 -261226 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अधिक व्हिडिओ संदेश जारी करताना राज्यात ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण दर 20 टक्के आहे. म्हणजे शंभर चाचणी पैकी राज्यभरात 20 बाधित आढळतात. चंद्रपूर मध्ये शंभर पैकी केवळ दोन बाधित आढळत आहे. मात्र गेल्या काही दिवसात यामध्ये वाढ होणे सुरू झाली होती. त्यामुळे हा लॉक डाऊन आहे.

    त्यामुळे जनतेने कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये व कोणतीही माहिती लपवू नये ,असे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या 24 तासात साडेतीनशे पेक्षा अधिक चाचण्या घेण्यात आल्या असून पुढील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात एंटीजन चाचण्या देखील वाढविण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहरातील संशयित रुग्णांची पूर्ण तपासणी जवळपास पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व सूचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मनपाकडून चाचणी व निर्जंतुकीकरण मोहीम

आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे समन्वयात लॉकडाऊनची कडक अमलबजावणी करण्यात आली. पुढील दहा दिवस महानगरपालिकेकडून संसर्ग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबविली जात आहे.  मनपाद्वारे अँटीजन तपासणी केंद्रही स्थापित करण्यात आले असून याद्वारे संसर्गाची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे. शकुंतला लॉनवर मनपा आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्स सातत्याने कार्यरत आहेत.     

      मनपाद्वारे जबाबदारीने आणि नागरीकांच्या आरोग्यासाठी निर्जंतुकीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. संपुर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची चमू यासाठी कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी डीप क्लीनिंग मोहीम शहराच्या विविध भागात राबविण्यात आली. शहराच्या 8 प्रतिबंधित क्षेत्रात सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येऊन सातत्याने फॉगिंग, फवारणी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे केले जात आहे.                 

 शहरात लॉक डाऊन करण्याची कारणे..

 1. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ करण्यासाठी
2. रुग्ण वाढीची साखळी तोडण्यासाठी
3. संपर्कातून रुग्ण वाढीला आळा घालण्यासाठी
4. पहिल्या चार ते पाच दिवसात लक्षणे दिसणाऱ्याना ओळखण्यासाठी
5. शहरात मुक्तपणे तपासणी मोहीम हाती घेण्यासाठी
6. शहरात एंटीजन तपासणी सुरू करण्यासाठी
7. रुग्ण घराघरातून शोधून बाहेर काढण्यासाठी
8. उपचार, चाचणी, अलगीकरण या त्रिसूत्रीला राबविण्यासाठी
9. प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणीसाठी
10. शहरांमध्ये सर्व भागात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी