चंद्रपूर येथील धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा कार्यक्रम रद्द, बौद्ध बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनchandrapur


चंद्रपूर, दि. 14 ऑक्‍टोबर : 16 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील  दिक्षाभूमी येथे लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली होती. त्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर येथील ऐतिहासिक पवित्र दिक्षाभूमीवर दरवर्षी 15 व 16 ऑक्टोबरला लाखो बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत धम्मचक्र अनुप्रवर्तन  समारंभाचे भव्य आयोजन करण्यात येते. परंतु, या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समस्त जनतेचे हित, केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार संस्थेने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. त्यामुळे बौद्ध बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम रद्द केल्यामुळे दिक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये कोणतेही दुकान, बुक स्टॉल साठी परवानगी  देण्यात आलेली नाही. समस्त बौद्ध बांधवांना  धम्मचक्र अनुप्रवर्तन  दिनानिमित्त घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  करून धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन घरीच साजरा करावा. 15 व 16 ऑक्टोंबर रोजी कोणीही दीक्षाभूमी चंद्रपूर परिसरात गर्दी करू नये, असेही आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे