मतदार संघातील प्रस्थापितांची मक्तेदारी आता संपवा – प्रशांत डेकाटे, पदवीधर निवडणूक : पदवीधर बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडणार

मतदार संघातील प्रस्थापितांची मक्तेदारी आता संपवा – प्रशांत डेकाटे

पदवीधर निवडणूक : पदवीधर बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडणार

नागपूर, ता. २८ : नागपूर पदवीधर मतदारसंघ एकाच पक्षाकडे मागील ५० वर्षांपासून आहे. या काळात उमेदवारांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न असो वा शिक्षकांचे प्रश्न असो एकाही प्रश्नाला न्याय दिला नाही. पदवीधर मतदार संघ ही एकाच पक्षाची मक्तेदारी नाही. ही मक्तेदारी आता संपुष्टात आणा, पदवीधऱांचे प्रश्न मांडण्यासाठी नव्या उमेदवाराला संधी द्या, असे आवाहन सिनेट परिवर्तन पॅनलचे उमेदवार प्रशांत डेकाटे यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षात आंबेडकरी विचार संघटना या विखुरलेल्या होत्या. अशा विखुरलेल्या ८ संघटना एकत्र करून परिवर्तन पॅनल ही संघटना तयार करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठात दोन अधीकृत उमेदवार सिनेट सदस्य म्हणून निवडणून गेले. या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला. आता पदवीधर निवडणूक रिंगणात पक्षातर्फे मी उभा आहे. निवडूण आल्यानंतर पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. विदर्भात नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे विदर्भातील पोरांना पुणे मुंबई या ठिकाणी पायपीट करावी लागते. मी निवडणून आल्यानंतर नागपुरात ओद्योगिकरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन प्रशांत डेकाटे यांनी दिले. मी कोणत्याही पक्षाला बांधिल नसल्यामुळे मी कुठल्याही विचारधारेशी संबधित नाही. स्वातंत्र्य, बंधुता, समानता या तत्त्वांवर आधारित शिक्षण पद्धती आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असे आश्वासन प्रशांत डेकाटे यांनी दिले.

प्रशांत डेकाटे यांनी नागपुरातील काही भागांमध्ये प्रचार दौरा केला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत डेकाटे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम, भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स ऑर्गनायेशन, ऑर्गनायेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स वेलफेअर असोसिएशन, फुले शाहू अध्यापक परिषद या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी प्रशांत डेकाटे यांच्यासमवेत सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम, महेश बनसोड, भूषण वाघमारे, सूरज तागडे, अलोक गजभिये, प्रतिक बनकर प्रामुख्याने उपस्थित होते.