युवा झेप प्रतिष्ठानद्वारा कोरोना काळात अन्नदानाचे कार्य, महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून घडले सेवाकार्य yuva zep prathisthan corona kalat annadan kary

युवा झेप प्रतिष्ठानद्वारा कोरोना काळात अन्नदानाचे कार्य

महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून घडले सेवाकार्य

नागपूर, ता. २० : कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांचे मोठे हाल झाले. कित्येकांच्या हातचे काम गेले. दोन वेळच्या जेवणाची नामुष्की आली. अशामध्ये देशात सर्वत्र अनेक सेवाभावी लोक, संस्था पुढे आल्या. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही असेच चित्र पाहायला मिळाले. शासकीय संस्थाही यामध्ये मागे नव्हत्याच. यात महत्वाची भूमिका बजावली तरुणांनी.

युवा झेप प्रतिष्ठान या नागपुरातील सामाजिक कार्यात अग्रेसर संस्थेद्वारे या अन्नदानाच्या सेवाकार्यात मोठा वाटा राहिला. युवा झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात प्रतिष्ठानच्या सदस्यांमार्फत तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत अन्न पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. हातचे काम गेले असले तरी कुणीही उपाशी राहू नये म्हणून प्रतिष्ठानचे युवांची धडपड सुरू होती. सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रतिष्ठानचे युवक नागरिकांपर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी कार्यरत होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना गरजूंची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. ज्यांना गरज आहे त्यांनी संपर्क साधण्याचीही विनंती करण्यात आली. संकटाचा काळ सर्वांसाठीच होता मात्र या काळात लढण्याचे आणि हिंमतीने सामोरे जाण्याचे बळ प्रतिष्ठानद्वारे देण्यात आले. या सेवाकार्याद्वारे दररोज सुमारे ६ ते ७ हजार लोकांना अन्न पोहोचविण्याचे मोठे कार्य प्रतिष्ठानद्वारे करण्यात आले 

अनेक क्षेत्रात काम करणारे तरुण, तरुणी युवा झेप प्रतिष्ठानशी जुळलेले आहेत. सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या तरुणांना एकत्रित आणून त्यांना ‘युवा झेप प्रतिष्ठान’ हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची महापौर संदीप जोशी यांची संकल्पना अगदीच योग्य असल्याची प्रचिती कोव्हिडच्या काळात आली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य महापौर संदीप जोशी यांच्यामार्फत आजही सुरू आहेत, हे विशेष.