वीस हजार कोविशिल्ड लस चंद्रपूरमध्ये दाखल, नऊ हजार कोरोना योध्यांना मिळणार लस corona Vaccine

वीस हजार कोविशिल्ड लस चंद्रपूरमध्ये दाखल
नऊ हजार कोरोना योध्यांना मिळणार लस

चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : कोरोनावर बहुप्रतिक्षीत लस अखेर जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजता दाखल झाली. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे 20 हजार  डोज प्राप्त झाले आहेत. आरोग्य सेवक सुभाष रंगारी व वाहन चालक विशाल गेडाम यांना ही लस नागपूर येथे पहाटे 4 वाजता प्राप्त झाली आणी त्यांनी सकाळी 7 वाजता ती चंद्रपूर येथे पोहोचवली. 
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम व जिल्हा पीएचएन नर्स छाया पाटील, शिततंत्रज्ञ स्वप्नली कांबळी तसेच आरोग्य विभागाच्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून  या लस वहन करणाऱ्या शीत वाहनाचे आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आणि आनंद व्यक्त केला.  
कोरोना  विषाणू संसर्गाने जगभर थैमान घातले आहे.  या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी भारतासह जगातील अनेक देश यावर लसीचे संशोधन करीत होते. महाराष्ट्राच्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या कंपनीत तयार झालेली कोविशिल्ड ही लस पहिल्या टप्प्यातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यासाठी चंद्रपूर येते दाखल झाली.
जिल्ह्यात दाखल झालेल्या 20 हजार लसीचे डोज जिल्हा परिषद विभागाच्या औषधी भांडार कक्षात तयार करण्यात आलेल्या शीत कक्षामध्ये  ठेवण्यात आल्या आहेत. ही लस आजच जिल्हयातील 6 केंद्रावर वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.  जिल्ह्यात 16 जानेवारीला 6 केंद्रावर लसीकरण होणार आहे. यात चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्रात तसचे वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा येथील केंद्रांवर लसीकरण होणार आहे.   

  जिल्ह्यात नऊ हजार लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोज देण्यात येणार असून त्याच नऊ हजार लाभार्थ्यांना दुसरा डोज 28 दिवसानंतर देण्यात येईल.  

जिल्ह्यात राज्य शासनाचे 12 हजार 275, केंद्र शासनाचे 414 तर खाजगीतील 3 हजार 835  असे एकूण 16 हजार 524 कोरोना योद्धा आरोग्य सेवकांची पहिल्या टप्प्यात लस देण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. एका व्यक्तीला दोन डोस तसेच 10 टक्के वेस्टेज याप्रमाणे जिल्ह्याला 36 हजार 352 लसीची आवश्यकता होती. यापैकी मागणीच्या 55 टक्के म्हणजे 20 हजार लस सध्या मिळाल्या असून उर्वरित लस लवकरच प्राप्त होणार आहे. 

लस पुर्णत: सुरक्षीत – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

             जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेवून या 20 हजार लसीचे सुक्म्न नियोजन करण्याचे तसेच जेथे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी प्राधाण्याने ही लस देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहे. ही लस शासनाने प्रमाणीत केली असून पुर्णत: सुरक्षीत असल्याचेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले आहे.  

बैठकीला महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिमित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.