चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी सफाई कामगार भरतीसंदर्भात कार्यवाही त्वरित करावी – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार #ChandrapurGovenmentMedicalCollege

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी सफाई कामगार भरतीसंदर्भात कार्यवाही त्वरित करावी – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 17 फेब्रूवारी : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कंत्राटी सफाई कामगार भरतीसंदर्भात निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदेची नियमानुसार पूर्तता करणाऱ्या कंत्राटदाराला त्वरित नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली. बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांची स्वच्छता याला प्राधान्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु़ग्णालयामध्ये कंत्राटी सफाई कामगारांच्या भरतीसंदर्भात काढण्यात आलेल्या निविदेसदंर्भातील कार्यवाही त्वरित करावी.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम सध्या सुरु असून कामाची सद्यस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी लवकरच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर संयुक्त पाहणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.