महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोना #MaharashtraEducation #महाराष्ट्रसरकार #Covid-19


महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोना

मुंबई : महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये मिशिन बिगीन अंतर्गत विविध भागात शाळा उघडण्यात आल्या. मात्रा, शाळा उघडल्यानंतर काही दिवसांमध्येच अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांमध्ये तर कोरोनाचा स्फोट झाल्याचं बघायला मिळालं आहे.

वाशिममध्ये 4 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगावमधील निवासी शाळेतील 4 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थी दोन दिवसात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या.
लातूर शहरातल्या एकाच शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्याने 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत. एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर येथे तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृहातच विलगिकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. या प्रकारामुळे शासकीय तसेच खासगी वसतीगृह सुरु करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे.