अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा, राजीनामा पत्र सविस्तार #AnilDeshmukh #महाराष्ट्रसरकार

अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा

राजीनामा पत्र सविस्तार

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर  100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती ती याचिका फेटाळल्यानंतर त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात अ‌ॅड.जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देत सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.
मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.