चंद्रपूर शहरात पीओपी मूर्तींवर कडक बंदी; १० हजारांचा दंड आकारणार। #ChandrapurCity #POPGaneshMurti #CMCChandrapur

चंद्रपूर शहरात पीओपी मूर्तींवर कडक बंदी; १० हजारांचा दंड आकारणार 

⏩ मनपा आयुक्त राजेश मोहिते यांचे आदेश 

⏩ पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई 

#Loktantrakiawaaz
#ChandrapurCMCNews
चंद्रपूर, ता. ९ ऑगस्ट : गणेशोत्सवाला महिनाभर वेळ असलातरी तयारी मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले. 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत पीओपी मूर्ती बंदी संदर्भात शहरातील मूर्तिकाराची बैठक सोमवारी (ता. ९ ऑगस्ट) मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके यांच्यासह स्वच्छता अधिकारी, प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थिती होते.
    बैठकीत पीओपी मूर्तींवर बंदी संदर्भात मूर्तिकार प्रतिनिधीची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. यावेळी सर्वानी बंदीला सहकार्य करण्यास सकारात्मकता दर्शविली. विक्री करणाऱ्या सर्व मूर्तिकारांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी डिपॉझिट निश्चित करून त्यासाठी झोननिहाय सुविधा केली जाईल. 

   केंद्र सरकारच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी राहणार आहे. त्यात पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा अश्या प्रकारची तक्रार आल्यास कारवाईकरीता सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात पोलीस विभाग,मुर्तीकार, सामाजीक संस्थांचे प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षक यांची समिती बनवुन झोननिहाय पथक कारवाई करणार आहेत. 
   कारवाईदरम्यान पीओपी मूर्ती आढळून आल्यास १० हजारांचा दंड आकारण्यात येईल. संबंधित विक्रेत्यांची दुकाने आणि गोडावून सील करण्यात येईल. तसेच डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे परवाना बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.

  गणेशोत्सवादरम्यान प्रदूषणास हानी होईल, अशा मूर्तीची निर्मिती करू नये, मातीच्या मूर्तींना अपायकारक रंगाचा वापर न करता नैर्सगिक रंगाचा वापर करावा, नागरीकांनी मुर्तींचे विसर्जन न करता प्रतिकात्मक विसर्जन करावे व मुर्ती दान करावी, सार्वजनिक मंडळांची ४ फुटापर्यंत मूर्ती तर घरगुती मूर्ती २ फुटापर्यंत असावी, घरगुती बाप्पांचे विसर्जन शक्यतो घरीच करावे अथवा फिरते विसर्जन कुंड व कृत्रीम तलावात करावे, निर्माल्य कुंडाचा वापर करावा, थर्माकोल आणि सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले.   
⏩ यंदा साकारा पर्यावरणस्नेही बाप्पा : महापौर राखी संजय कंचर्लावार

आज पर्यावरण आणि आरोग्य जपण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी यंदा पर्यावरणस्नेही बाप्पा साकारावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. त्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत "पर्यावरणस्नेही बाप्पा" ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सार्वजनीक तसेच घरगुती मूर्तीसाठी ही स्पर्धा असून ती झोननिहाय घेण्यात येईल. उत्कृष्ट ३ सार्वजनीक तसेच घरगुती मुर्तींसाठी पुरस्कार देण्यात येईल. उत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या. पर्यावरणाकडे लक्ष द्या, केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.