महानगर पालिका निवडणुका: महाराष्ट्रातील महानगरपालिका 3 सदस्यीय प्रभाग पध्दत Maharashtra Mahanagar Palika Election

महानगर पालिका निवडणुका: महाराष्ट्रातील महानगरपालिका 3 सदस्यीय प्रभाग पध्दत

#Loktantrakiawaaz

मुंबई, 22 सेप्टेंबर : आगामी १८ पालिका निवडणुकीसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. मुंबई सोडून उर्वरित महापालिकांच्या निवडणुकीसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का मानला जात आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र २ सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही १ सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग रचनेवरुन मतभेद दिसून आले. काही मंत्री प्रभाग तर काही मंत्री वार्ड पद्धतीसाठी आग्रही होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत वादही झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र अखेर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करत हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर (Mumbai, Pune, Pimpri-Chichwad, Thane, Ulhasnagar, Bhivandi-Nijampur, Panvel, Mira-Bhaiyandar, Solapur, Nashik, Malegaon, Parbhani, Nanded-Waghala, Latur, Amravati, Akola,Nagpur And Chandrapur ) या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. त्यातून प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय होत नव्हता. पण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. आज घेतलेल्या निर्णयानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली आहे. यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यसंख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेनं ४ सदस्यांची भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र २ सदस्यांची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अखेर ३ सदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.