▶️ शिवभोजन थाळीची गुणवत्ता कायम राखण्याचे आवाहन
▶️ चंद्रपूर जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 19 ऑक्टोबर: गरजूंना दोन वेळच्या अन्नाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर (Ration Card) स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु काही शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करत नसल्यामुळे धान्याचा साठा पडून राहतो. परिणामी धान्य वाया जाते. कार्डधारक धान्याची उचल का करत नाही, तसेच कधीपासून संबंधित लाभार्थ्याने धान्याची उचल केली नाही, याबाबत माहिती घ्यावी. शहरी भागात ५९ हजार आणि ग्रामीण भागात ४४ हजार यापेक्षा ज्यांचे मासिक उत्पन्न (Monthly Income) जास्त होत असेल अशा लाभार्थ्यांना अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थी गटातून बाहेर काढुन इतर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी,अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujabal) यांनी पुरवठा विभागाला दिल्या.
हिराई विश्रामगृह, चंद्रपूर (Hirai Guest House Chandrapur) येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागासंदर्भात आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (Collector Ajay Gulhane), नागपूर विभागाचे पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी,वैधमापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक पांडुरंग बिरादर, उपनियंत्रक श्री. बोकडे, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगिरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
कोरोना (Corona) काळ सोडून इतर वेळी कोणी ध्यान्याची उचल केली नाही, असे लाभार्थी शोधून काढावे, असे निर्देश देत श्री. भुजबळ म्हणाले, लाभार्थ्यांना आॅनलाईन (Online) शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. धान्य साठवणुकीकरीता गोदाम उपलब्ध होण्यासाठी तसेच गोदामाच्या बांधकामाकरिता अहवाल तयार करून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यात धानाची 95 टक्के बिलिंग (Billing) झाली आहे. तसेच धानाच्या खरेदी बाबतीतही जिल्ह्याचे काम प्रशंसनीय असून धानाची उत्पादनक्षमता व खरेदी वाढविण्यावर भर द्यावा. त्यासोबतच, शिवभोजन योजना ही सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना असून शिवभोजन योजनेत शिवभोजन थाळ्यांची (Shivbhojan Thali) गुणवत्ता कायम राखावी, अशाही सूचना त्यांनी केल्या.
काही स्वस्त धान्य दुकानांच्या व्यक्तिगत तक्रारी येतात. त्या तक्रारीत तथ्य वाटल्यास सदर दुकानांवर कडक कार्यवाही करावी. तसेच शहरात लोकसंख्या वाढली असून रेशनकार्ड धारकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे खरेदी-विक्री, बिलिंग,धान्याची चोरी याबाबत माहिती घेऊन कार्यवाही करावी. काही ठिकाणी धान खरेदी केंद्रे देणे आवश्यक असले तरी जुने खरेदी केंद्र सुरू ठेवावे व त्यात काही त्रुटी असल्यास लक्ष द्यावे. दुकानांमध्ये किती माल गेला, उचल किती झाली व शिल्लक किती आहे, याची नियमितपणे तपासणी करा. धान्याच्या चोरीचे प्रकार आढळल्यास त्वरीत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी श्री. भुजबळ यांनी संबंधित विभागाच्या अडी-अडचणींची माहिती जाणून घेतली. तसेच शिधापत्रिका, धान खरेदी, भरडधान्य, धान्याची उचल व शिल्लक तसेच शिवभोजन उद्दिष्ट, वैधमापन विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाया या विषयावर अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 36 शिवभोजन केंद्रे कार्यरत असून दैनंदिन 3950 शिवभोजन थाळ्यांचा इष्टांक देण्यात येतो, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी यांनी बैठकीत दिली.