स्वच्छ अमृत महोत्सवात चंद्रपूरचा गौरव; थ्री स्टार नामांकन Chandrapur Municipal Corporation

स्वच्छ अमृत महोत्सवात चंद्रपूरचा गौरव; थ्री स्टार नामांकन

चंद्रपूर, ता. २१ नवंबर : स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'स्वच्छ अमृत महोत्सवा'मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यात  कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित  केलेल्या 3- तारांकित (थ्री स्टार) नामांकनमध्ये चंद्रपूर शहराचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवीन दिल्ली येथे पार पडलेल्या सोहळ्यात चंद्रपूरनगरीच्या महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार तसेच आयुक्त राजेश मोहिते यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
(Chandrapur Municipal Corporation,
Chandrapur City Municipal Corporation,
Chandrapur CMC, TriStar Award)

स्वच्छ भारत अभियान (शहरी)च्या स्वच्छ सर्वेक्षण 2021, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि शहरांसाठी कचरामुक्त तारांकित क्रमवारीचे प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रमांतर्गत नगरे /शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या आणि या कामाला ओळख देण्याच्या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातो. कचरामुक्त शहराच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित केलेल्या 3- तारांकितमध्ये एकूण 143 शहरांत चंद्रपूरचा समावेश आहे.  
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी करत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छता अँपवरही नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री हरदीप सिंग पुरी आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री श्री कौशल किशोर यांनी छत्तीसगड आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि अंदमान आणि निकोबार बेटचे नायब राज्यपाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.