Maharashtra Corona New Guideline : महाराष्ट्र राज्य सरकारचे नवे निर्बंध, लग्नाला 50 तर अंत्यविधीला फक्त 20 लोकांना परवानगी

Maharashtra Corona New Guideline : महाराष्ट्र राज्य सरकारचे नवे निर्बंध, 

लग्नाला 50 तर अंत्यविधीला फक्त 20 लोकांना परवानगी

#Loktantrakiawaaz
मुंबई, 31 डिसम्बर : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते (New Year). या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackrey)  हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

➡️ काय आहेत नवे निर्बंध?

1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी

2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू

5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा

6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.

➡️ गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केलं.

लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र सरकारनं 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचं शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्यानं करावं याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लर न घेतलेल्या लोकांचं लसीकरण तातडीने झालं पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.