इंधन दर कपातीवरुन देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा; महाराष्ट्र राज्याकडून दरात किती कपात? Devendra Fadnavis targets Maharashtra government over fuel price cuts; How much reduction in rates from Maharashtra State?

इंधन दर कपातीवरुन देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा;

महाराष्ट्र राज्याकडून दरात किती कपात?

#Loktantrakiawaaz
मुंबई, 22 मे : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं सामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर (Petrol Price) प्रतिलिटर 9.5 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रानं इंधन दरात कपात केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानुसार आज राज्य सरकारकडूनही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रति लिटर कपात केलीय. मात्र, ही कपात म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते, अशी खोचक टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर केलीय.
‘इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के! इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’! अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केलीय.
केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून (22 मे) पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती. आता हे दर कमी करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं.

Devendra Fadnavis targets Maharashtra government over fuel price cuts;  
How much reduction in rates from Maharashtra State?

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.