चंद्रपुर जिल्‍हयातील एकाही रेल्‍वे अतिक्रमीताचे घर पाडू नये – आ. मुनगंटीवार, आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी व रेल्‍वे अधिका-यांसोबत घेतला आढावा None of the railway encroachment houses in Chandrapur district should be demolished. Mla Sudhir Mungantiwar, MLA Mungantiwar along with District Collector and Railway Officers conducted the review

चंद्रपुर जिल्‍हयातील एकाही रेल्‍वे अतिक्रमीताचे घर पाडू नये – आ. मुनगंटीवार

आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी व रेल्‍वे अधिका-यांसोबत घेतला आढावा

रेल्‍वे अतिक्रमीत धारकांना आ. मुनगंटीवार यांचा दिलासा

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 12 मे: चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये बल्‍लारशाह, माजरी व चंद्रपूर येथील रेल्‍वेच्‍या जागेवर अतिक्रमण केलेल्‍या लोकांना रेल्‍वे विभागाद्वारे त्‍यांची राहती घरे व जागा रिकाम्‍या करण्‍यासंदर्भात नोटीस देण्‍यात आली होती. हे सर्व लोक गेल्‍या अनेक वर्षांपासून त्‍या जागेवर राहत आहेत. आता अचानक अशाप्रकारची नोटीस देवून रेल्‍वे प्रशासन आमच्‍यावर दबाब आणत आहे अशी याठिकाणी राहणा-या नागरिकांची भुमीका झाली आहे. त्‍यावर तोडगा म्‍हणून लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांच्‍यासोबत एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पर्यायी व्‍यवस्‍था होईपर्यंत यापैकी एकाही नागरिकाचे घर किंवा जागा रिकामे करू नये असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
या बैठकीला रेल्‍वेचे अधिकारी, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी, निवासी उपजिल्‍हाधिकारी, तहसिलदार चंद्रपूर, बल्‍लारपूर, वरोरा, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, अजय दुबे, ब्रिजभूषण पाझारे, संजय गजपुरे, नामदेव डाहूले, चंद्रपूरातील जलनगर भागातील अनेक नागरिक उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले की, लोकप्रतिनिधी म्‍हणून रेल्‍वेला अत्‍यावश्‍यक असेल तिथे जागा रिकामी करण्‍यास हरकत नाही, परंतु त्‍या लोकांची राहण्‍याची पर्यायी व्‍यवस्‍था करा. बल्‍लारपूरला फक्‍त ११ लोकांना घरे रिकामी करण्‍यास सांगण्‍यात आले आहे. त्‍यांची पर्यायी व्‍यवस्‍था तातडीने करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. बैठकीत बोलताना जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांनी रेल्‍वे विभागाला त्‍यांच्‍या असणा-या जमिनी संदर्भातील सर्व कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्‍यास सांगीतले. तो पर्यंत कोणालाही त्‍या जमिनीवरून काढण्‍यात येवू नये असे निर्देश सुध्‍दा त्‍यांनी दिले.
ताडाळी ते घुग्‍गुस रेल्‍वे लाईनवरून मौजा साखरवाही येथील शेतक-यांना ये-जा करण्‍याकरिता अंडरपास (बोगदा) किंवा गेट करून देण्‍यासंदर्भात निवेदन भाजपाचे जिल्‍हा महासचिव नामदेव डाहूले यांच्‍या नेतृत्‍वात साखरवाहीच्‍या शिष्‍टमंडळाने मा. जिल्‍हाधिका-यांना दिले.
याठिकाणी आधी जाण्‍यायेण्‍यासाठी रस्‍ता होता, परंतु सुमारे एक महिन्‍यापूर्वी एक ट्रॅक्‍टर तिथून जाताना रेल्‍वेच्‍या धडकेने त्‍या ट्रॅक्‍टरचे दोन तुकडे झाले. त्‍यावर उपाययोजना न करता रेल्‍वेने त्‍या ट्रॅक्‍टर मालकालाच नोटीस पाठविली आणि पलिकडे जाण्‍याचा रस्‍ता पूर्णपणे बंद केला. रेल्‍वे गेटच्‍या दुस-या बाजूने हजार ते दिड हजार एकर शेती आहे. ज्‍याकरिता गावातुन हा मार्ग ओलांडून जाणे भाग आहे. अशा वेळेला मागील दोन वर्षापासून मागणी करूनही ना गेट लावले न बोगदा बांधला. यावर ताबडतोब उपाययोजना करण्‍याच्‍या निर्देश यावेळी आ. मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी रेल्‍वेशी संबंधित सर्व विषयांवर सखोल चर्चा झाली. आ. मुनगंटीवार यांनी लवकरात लवकर मा. रेल्‍वे मंत्र्यांची भेट घेवून या सर्व समस्‍या त्‍यांच्‍यासमोर मांडण्‍याचे आश्‍वासन दिले.
None of the railway encroachment houses in Chandrapur district should be demolished. Mla Sudhir Mungantiwar, MLA  Mungantiwar along with District Collector and Railway Officers conducted the review