संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, शिक्षण विभागाकडून ‘शिक्षक संवाद दिन’ उपक्रमाची सुरवात Overcoming the Crisis and Leading the District on the Path of Development - Chandrapur Guardian Minister Vijay Wadettiwar, Maharashtra Day Main Flag Raising Program.

🔹 संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

🔹 महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

🔹 शिक्षण विभागाकडून ‘शिक्षक संवाद दिन’ उपक्रमाची सुरवात

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 1 मे : आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. महाराष्ट्र हे सुरवातीपासूनच विविध क्षेत्रात अग्रणी असलेले राज्य आहे. गत दोन वर्षात कोरोनाच्या तसेच नैसर्गिक संकटावर मात करून राज्य सरकार विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यात जिल्हा प्रशासनाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
पोलिस मुख्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे आदी उपस्थित होते.
आज महाराष्ट्र दिनासोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिन तसेच चंद्रपूर जिल्हा परिषदेचा स्थापना दिन आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीन विकास करणा-या ‘मिनी मंत्रालयाला’ सुध्दा आज 60 वर्षे पूर्ण होत आहे. आजपासून शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी लाभाच्या नवीन 105 लोकसेवा लागू करण्यात येत आहे. तसेच लोकशाही दिनाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागामार्फत आजपासून ‘शिक्षक संवाद दिन’ सुरू करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात मागील वर्षभरात आदिवासी बांधवांना 85 वैयक्तिक वनहक्कांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 4249 वनहक्क दावे मंजूर करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात 2658 विद्यार्थ्यांना 8 कोटी 85 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला. शिष्यवृत्ती योजनेंतर्गत डीबीटी पोर्टलद्वारे 31 हजार विद्यार्थ्यांना 30 कोटी 38 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे 72 नवीन वसतीगृह सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऐवढेच नाही तर राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 2200 कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा, मूल, ब्रम्हपूरी, सिंदेवाही आणि सावली येथे महिलांना रोजगार देण्यासाठी गालिचा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत सुमारे 13 कोटी 50 लक्ष  रुपयांची प्रशासकीय मान्यता जिल्हा खनीज प्रतिष्ठानमार्फत मिळाली आहे. माविमच्या वतीने तेजश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील अत्यंत गरीब महिलांना जवळपास 2 कोटी 97 लक्ष 80 हजार रुपयांची आर्थिक मदत, कर्ज स्वरुपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात 2 मे 2020 रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता दोन वर्षानंतर 7 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्यात एकही ॲक्टीव्ह रुग्ण नसल्याची नोंद झाली. या दोन वर्षात संपूर्ण जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य तसेच इतर विभागांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोरोनाच्या संकटाचा सामना केला. आजघडीला जिल्ह्यात कोरोनाचा
प्रादुर्भाव नसला तरी दिल्ली, मुंबई व इतर ठिकाणी पुन्हा कोरोनाचे रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा ते दिवस येऊ नये, म्हणून नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
➡️ महाराष्ट्र दिनी यांचा झाला सत्कार : उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुणकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, हेड काँस्टेबल किसन राठोड यांना जाहीर झालेले पोलिस महासंचालक पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श तलाठी म्हणून मौजा चौगान (ता. ब्रम्हपूरी) येथील सी.आर. ठाकरे, ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी काम केल्याबद्दल अव्वल कारकून अजय वाटवे आणि मारुती वरभे, वन प्रकल्पांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रवीण सातपुते यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन तसेच पुस्तिकेचे विमोचर करण्यात आले.

Overcoming the Crisis and Leading the District on the Path of Development - Chandrapur Guardian Minister Vijay Wadettiwar, Maharashtra Day Main Flag Raising Program.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.