चंद्रपुर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2022, आरक्षण सोडत व प्रारूपावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर Chandrapur Zilla Parishad and Panchayat Samiti General Election-2022, Reservations

🔹 चंद्रपुर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2022

🔹 आरक्षण सोडत व प्रारूपावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर

चंद्रपूर, दि. 6 जुलै : जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता आरक्षण सोडत व आरक्षण प्रारुपावर हरकती व सुचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यानुसार आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूर, करीता सभा दि. 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथील सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडेल. आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा दि. 15 जुलै 2022 असून आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी हा 15 जुलै ते 21 जुलै 2022 पर्यंत राहील.

पंचायत समिती चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, मुल, सावली, पोभुंर्णा, गोंडपिपरी, बल्लारपूर, कोरपना, जिवती व राजुराकरीता आरक्षण निश्चित करण्यासाठी सभा दि. 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता त्या त्या संबंधित तहसील कार्यालयात पार पडेल. आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा दि. 15 जुलै 2022 राहील तर आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 15 जुलै ते 21 जुलै 2022 पर्यंत राहील. 

जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा असेल त्यांनी वरील ठिकाणी विहित वेळेत हजर राहावे, असे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी मांजे यांनी कळविले आहे.

Chandrapur Zilla Parishad and Panchayat Samiti General Election-2022,  Reservations