आरक्षण सोडत बैठकीस तुर्तास स्थगिती
चंद्रपूर, दि. 12 जुलै : जिल्हा परिषद, चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता आरक्षण सोडत 13 जुलै 2022 रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता या आरक्षण सोडत बैठकीस राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या 5 जुलै 2022 च्या आदेशान्वये, राज्यातील 25 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणा-या 284 पंचायत समिती निर्वाचक गणातील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरीता आरक्षित जागा निश्चित करण्याकरीता सोडत काढण्याचा कार्यक्रम प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील निवडणूक विभाग व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाचे आरक्षण 13 जुलै रोजी सोडत काढून निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या 12 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये, चंद्रपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा-या पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रमास तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दि. 13 जुलै 2022 रोजी होणारी जि.प. व पं.स. आरक्षण सोडत सभा स्थगित करण्यात येत आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी मांजे यांनी कळविले आहे.
Chandrapur Zilla Parishad and Panchayat Samiti general election program.