चंद्रपुर शहर महानगर पालिका अधिकाऱ्यांद्वारे गणेश मूर्तींची तपासणी, पीओपी मुर्तीबंदीस सर्वांचे सहकार्य Inspection of Ganesha idols by Chandrapur City Municipal Corporation officials, cooperation of all to POP idol bans

चंद्रपुर शहर महानगर पालिका अधिकाऱ्यांद्वारे गणेश मूर्तींची तपासणी

पीओपी मुर्तीबंदीस सर्वांचे सहकार्य

चंद्रपूर २९ ऑगस्ट : चंद्रपुर शहरामध्ये पीओपी मुर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सक्त ताकीद देण्यात आली असून अंमलबजावणीसाठी तपास मोहीम राबविल्या जात आहे. मनपा स्वच्छता वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे मुर्ती विक्रेत्यांच्या दुकानात आकस्मिक भेटी देऊन तपासणी करण्यात आली.
चंद्रपुर शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरु असून श्रीगणेश मुर्ती विक्री सुरु आहे. विक्रेत्यांची आज तपासणी केली असता एकही पीओपी मुर्ती कुठेही आढ़ळुन आली नाही. तपासणी पथकाद्वारे विक्रेत्यांचे नोंदणी प्रमाणपत्र तपासण्यात आले तसेच नोंदणी प्रमाणपत्र घेणे बाकी असलेल्या मूर्तिकार यांना त्वरित नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मुर्तींवर पूर्णतः बंदी आहे. त्यात पीओपी मुर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे. याबाबतीत महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात शहरातील सर्व मुर्तीकारांची बैठकही घेण्यात आली होती. या नियमांचे कडेकोट पालन व्हावे, या दृष्टीने पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. दुकानात पीओपी मुर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके, मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, प्रदीप मडावी, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, उदय मैलारपवार, अनिरुद्ध राजूरकर, महेंद्र हजारे, अनिल ढवळे यांनी गणपती मूर्तीची पाहणी करून काही नमुने घेतले असुन गणपती मुर्ती पीओपीची आढळल्यास सक्त कारवाई करण्याच्या दृष्टीने अशी तपासणी शहरात ठिकठिकाणी केली जात आहे.त्यामुळे कुठेही पीओपी मुर्ती विक्री, साठा व खरेदी करू नये असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
Inspection of Ganesha idols by Chandrapur City Municipal Corporation officials, 
Cooperation of all to POP idol bans