प. पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून होणार मार्गदर्शन
चंद्रपूर : हिंदू धर्मात पवित्रता, संपन्नता, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गायीचे संगोपन करण्याचे काम श्री उज्ज्वल गौरक्षण संस्था (लोहारा) चंद्रपूर ही संस्था करीत आहे. मागील २८ वर्षांपासून हे कार्य शासकीय मदतीतून नाही, तर समाजातील दानशूर, गोपाल ग्रुपच्या सहकार्यातून सुरू आहे. या कार्याला समाजाचाही हातभार लागावा, या उद्देशातून श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे. १० ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाताळा मार्गावरील बालाजी मंदिरासमोर असलेल्या श्री साईराम लॉन येथे दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यक्रम होईल. प. पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून कथांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्रालादेखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय (गाईचे शेण), गोमूत्र (गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च असल्याचे नमूद आहे. मात्र, मागील काही वर्षांत गायींचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे आदरणीय प्रीतीसुधाजी म. सा. यांच्या प्रेरणेतून श्री उज्ज्वल गौरक्षण संस्था लोहारा येथे सुरू करण्यात आली आहे. २८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेत आजघडीला तब्बल ५५० गोधन (गाय, बैल) आहेत. राज्यात गो हत्येला बंदी असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी तस्करी करताना पकडण्यात आलेल्या गायी, बैलांचा यात मोठ्या संख्येने समावेश आहे.
या जनावरांच्या महिन्याकाठी पालनपोषणाचा खर्च सुमारे ३.५० लाख ते ४ लाख रुपयांच्या घरात आहे. हा सर्व खर्च समाजातील दानशुरांच्या मदतीतून भागविला जात आहे. आजघडीला या संस्थेत मजूर आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे गौरक्षणाच्या या पवीत्र कार्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. गोधनाला चारा उपलब्ध व्हावा या उद्देशातून १६ एकर जमीनीतून गवताचे उत्पादन घेतले जाते. परंतु, दाताळा मार्गावरील या शेतीतून लोहारा येथे चारा नेणे मोठी खर्चिक बाब झाली आहे. त्यामुळे या पवीत्र कार्यात अनेकांची मदत व्हावी, या उद्देशातून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला सीए कमल किशोर राठी, ओम प्रकाश सारडा, योगेश भंडारी, प्रा. जुगल किशोर सोमानी, सीए दामोदर सारडा, हिम्मतभाई शाह, रोडमल गहलोत, दिनेश बजाज, मुकुंद गांधी, पंकज शर्मा, सुधीर शामलाल बजाज आदींची उपस्थिती होती.
Shrimad Bhagwat Katha from Chandrapurat 10th December