🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 19 जानेवारी : भाषेवरून आपली ओळख ठरते. मराठी भाषा ही अतिप्राचीन आहे. मातृभाषेतून एखादी गोष्ट समजणे किंवा बोलणे हे अगदी सहजपणे होते. आज जागतिकीकरणाचे युग असले तरी आपल्या मातृभाषेला विसरू नका. मराठी भाषेचा अभिमान बाळगा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित ‘वाचन प्रेरणा उपक्रम’ या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय बेले, मराठी विभाग प्रमुख डॉ. विजया गेडाम, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
दीक्षाभुमी या पवित्र भुमीतून मराठी भाषा पंधरवडा उपक्रमाची सुरुवात होत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, मातृभाषेसंदर्भात एक वेगळेच आकर्षण असते. ती समजायला आणि बोलायला सहज असते. मातृभाषेतून शिक्षण झाले तर आकलनशक्ती वाढते, असे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. आज जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्व वाढले असले तरी विद्यार्थ्यांनो मातृभाषेला विसरू नका. मराठी भाषेचा अभिमान बाळगा. तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीचा जास्तीत जास्त वापर करा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक सरदार पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. बन्सोड म्हणाले, पुस्तकांसाठी बाबासाहेबांचा फारच आग्रह होता. वाचनाने माणूस समृध्द होतो. भाषा ही भाषाच असते. ती शुध्द – अशुध्द नसते. बोलीभाषेत सौंदर्य असल्यामुळेच ती काळजाला भिडते. आज सर्वत्र माहिती उपलब्ध आहेत. मात्र वाचनामुळे ज्ञान वाढते. खरी माहिती आणि इतिहास माहित करायचा असेल तर वाचणाशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बोलीभाषेतील विविध कवितांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दहेगावकर म्हणाले, मराठी भाषेचा उदय अतिप्राचीन आहे. पाचव्या किंवा सहाव्या शतकात ताम्रपट आणि 12 किंवा 13 शतकापासून लिळाचरित्राला सुरवात झाली. त्यानंतर ज्ञानेश्वरी आली. आपल्या भाषेचे जतन होणे आवश्यक आहे. आज मराठी भाषेवरच संवर्धनाची वेळ यावी, हे दुदैवी आहे. तसेच साहित्य हे दर्जेदारच असायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंबेडकर महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. विजया गेडाम यांनी केले. संचालन सुशील सहारे यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be proud of Marathi language - Collector Vinay Gowda, Marathi language conservation fortnight in Dr Babasaheb Ambedkar college