निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान योजनेच्या जाहिराती लघु वृत्तपत्रांना देण्याची न्यूज पेपर संघटनेची मागणी
#Loktantrakiawaaz
माजलगाव, 3 मार्च - महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान ही प्रसिद्धी मोहीम सुरू असून या मोहिमे अंतर्गत उच्च आणि मध्यम वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जात आहेत लघु वृत्तपत्रांना या जाहिराती दिल्या जात नाहीत त्यामुळे "निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान" ही प्रसिद्धी मोहीम राबवताना लघू वृत्तपत्रांनाही या जाहिराती दिल्या जाव्यात अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात प्रदीप कुलकर्णी यांनी पुढे असे म्हटले आहे की शासनाचे सर्व निर्णय आणि सर्व प्रकारच्या बातम्या या लघुसंवर्गातील वृत्तपत्रातून प्राधान्याने प्रसिद्ध केल्या जातात. या वृत्तपत्रांचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाचक वर्ग असून शासनाच्या चांगल्या कार्याची प्रसिद्धी उत्तम रीतीने ही वृत्तपत्रे करतात. तेव्हा या वृत्तपत्रांना जाहिराती देऊन सर्व वृत्तपत्रांची निकोप वाढ व्हावी असे जे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे त्या अंतर्गत "निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान" या प्रसिद्धी मोहिमेच्या सर्व दर्शनी जाहिराती या शासनमान्य लघुसंवर्गातील वृत्तपत्रांना दिल्या जाव्यात. अशी मागणी करणारे निवेदन संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठविले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व लघु वृत्तपत्रांच्या संपादकांनी या प्रकारची मागणी शासन दरबारी लावून धरण्यासाठी ताबडतोब आपल्या लेटरहेडवर ही मागणी नामदार मुख्यमंत्री महोदयांकडे करावी असे आवाहनही राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.