चंद्रपूर जिल्ह्याचा शांततेचा नावलौकीक कायम ठेवा – जिल्हाधिकारी गौडा, सण उत्सवात नियमांचे पालन करण्याचे आवाहन, शांतता समितीच्या बैठकीत सदस्यांकडून सामाजिक सलोखा व ऐक्याची ग्वाही Maintain peace in Chandrapur district – Collector Gowda, A call to follow the rules in festival celebrations, Social harmony and unity assurance from the members in the Peace Committee meeting

▪️चंद्रपूर जिल्ह्याचा शांततेचा नावलौकीक कायम ठेवा – जिल्हाधिकारी गौडा

▪️सण उत्सवात नियमांचे पालन करण्याचे आवाहन

▪️ शांतता समितीच्या बैठकीत सदस्यांकडून सामाजिक सलोखा व ऐक्याची ग्वाही

चंद्रपूर, दि. 5 सेप्टेम्बर: आगामी काळात जिल्ह्यात गोकूळाष्टमी, पोळा, गणपती, ईद असे विविध धर्मीय सण साजरे केले जाणार आहे. त्यातच गणपती विसर्जन आणि ईद हे एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सणांमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले जाते. चंद्रपूर जिल्हा आणि शहर हे सुरवातीपासूनच शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते. सर्वधर्मीय सण/ उत्सव येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्यामुळे हीच ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. तर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यांनी चंद्रपूरचा सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित राहील, याची ग्वाही दिली.
नियोजन भवन येथे चंद्रपुर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

चंद्रपूरची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक जण आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, एकाच दिवशी गणपती विसर्जन आणि ईद असल्यामुळे सर्वांनी मिरवणुकीच्या वेळा पाळाव्यात तसेच नियमांचे पालन करावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिरवणुकीचे रस्ते व्यवस्थित करून घ्यावे. डीजे / लाऊडस्पीकरचा आवाज 55 डेसीबलपेक्षा जास्त नसावा. ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गणपती मंडळांना सर्व परवानग्या देण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या रस्त्यावर बॅनर, फटाके, कमानी लावण्यात येऊ नये. वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे. दाताळा रोडवरील इरई नदीत गणपती विसर्जनाची व्यवस्था मनपाने योग्य प्रकारे करावी.
सर्वांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. विशेष करून तरुणांनी. कोणत्याही परिस्थितीत आपल्या एखाद्या मॅसेजमुळे समाजभावना भडकणार नाही, यासाठी दक्ष असावे. जेष्ठ नागरिकांनी आपापल्या कुटुंबातील तरुणांना सोशल मिडीया वापराबाबत मार्गदर्शन करावे. सण / उत्सव हे आनंदाने आणि शांततेत पार पाडायचे असतात, याची सर्वांनी जाणीव ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सामाजिक सलोखा आणि ऐक्य  ही चंद्रपुरची परंपरा आहे. सण / उत्सव आनंदाने साजरे करून जिल्ह्याचा लौकिक कायम ठेवावा. गणेश मंडळाने सामाजिक विषयांवर देखावे करावेत. तसेच शासकीय परवानग्या देतांना लोकांना चकरा माराव्या लागू नये, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

▪️शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाचे कान-नाक-डोळे : पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी
गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे पोलिस विभागाकडून प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय मंडळाच्या बैठका घेणे सुरू आहे. यात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाने खरे कान-नाक-डोळे आहेत, असे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ईद ची मिरवणूक ही सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तर गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दुपारी 3 नंतर काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर याबाबत मंडळनिहाय चर्चा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचा सामाजिक एकोपा अतिशय घट्ट आहे. तरीसुध्दा बाहेरच्या जिल्ह्यात/राज्यात किंवा इतर ठिकाणी काही अघटीत घडल्यास त्याची प्रतिक्रिया चंद्रपुरात उमटू देऊ नका, याबाबत सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

▪️मनपातर्फे फिरते कुंड व निर्माल्य रथाचे आयोजन : आयुक्त विपीन पालीवाल
घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याकरीता चंद्रपूर शहरामध्ये 20 ते 30 कृत्रीम विसर्जन कुंडाचे नियोजन करण्यात येणार आहे. सोबतच फिरते कुंड आणि निर्माल्य गोळा करण्यासाठी रथाचेसुध्दा नियोजन आहे. नागरिकांनी ईद मिरवणूक व गणपती विसर्जनावेळी रस्त्यावर बॅनर, स्वागत गेट, पताका लावू नये. आपापल्या मिरवणुकीच्या वाहनांवरच बॅनर लावावे. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात पीओपीच्या मुर्तींना बंदी आहे. त्यामुळे पीओपीची मूर्ती बनवितांना किंवा विक्री करतांना आढळल्यास त्वरीत तक्रार करावी. गणेश मंडळांना एक खिडकी योजनेंतर्गत परवानग्या देण्यात येत आहे. याबाबत काही अडचण आल्यास मनपा सभागृहात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.

▪️शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : पीओपी मुर्तीच्या संदर्भात मनपाने मुर्तीकारांची बैठक घ्यावी. गणेश मंडळांनी परवानग्या कशा घ्याव्यात, याबाबत जनजागृती करावी. सोशल मिडीयावर अफवा पसरणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी. निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावावी. मनपाने कृत्रीम विसर्जन कुंड तयार करावे. मुर्तीचे नुकसान / मोडतोड होऊ नये म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंडळांनी गणेश मुर्तीसाठीची वाहने सुव्यवस्थित ठेवावी तसेच चालक मद्यप्राशन करणारा नसावा. डीजेबद्दलच्या नियमांची माहिती पोलिस विभागाने आपापल्या क्षेत्रातील मंडळांना द्यावी. मनपाने मंडळांना पेंडालचा आकार निश्चित करून द्यावा. एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानग्या एकाच वेळी देण्यात याव्या. विद्युत विभागाने पेंडॉलमधील इलेक्ट्रिक व्यवस्थेची पाहणी करावी. दाताळा रोडवरील इरई नदी येथे विसर्जनासाठी प्लॅटफॉर्म तयार करावा. सण / उत्सवाच्या दोन-तीन दिवसांपासून दारूविक्री बंद ठेवावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. संचालन उत्तम आवळे यांनी तर आभार पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी मानले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

Maintain peace in Chandrapur district – Collector Gowda

 ▪️A call to follow the rules in festival celebrations

 ▪️ Social harmony and unity assurance from the members in the Peace Committee meeting