आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर Chandrapur district administration on action mode in view of upcoming elections

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर
 जिल्हाधिका-यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
चंद्रपूर, दि. 20 जानेवारी: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील विधानसभानिहाय पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी आढावा घेतला.
नियोजन सभागृह येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., रंजित यादव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दगडू कुंभार, सार्वजनकि बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी मानसी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, सन 2014 व 2019 मध्ये चंद्रपूरची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पहिल्याच टप्प्यात झाली होती. ही शक्यता गृहीत धरून तसेच विदर्भात उन्हाळ्याची तिव्रता बघता आगामी 2024 ची लोकसभा निवडणूकसुध्दा पहिल्याच टप्प्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीसाठी कमी कालावधी मिळणार असल्याने आतापासून पूर्वतयारी करून ठेवावी. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे नियोजित वेळेत कामे करणे अपेक्षित आहे. यात कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
पुढे ते म्हणाले, आपल्याशी संबंधित प्रत्येक बाबींची इत्यंभूत माहिती संबंधित अधिकारी व नोडल अधिका-यांनी ठेवणे गरजेचे आहे. आपापल्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचा ॲक्शन प्लान व सुक्ष्म नियोजन करा. स्थानिक पातळीवर निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या विविध बैठकांचे इतिवृत्त व इतर नोंदी अपडेट ठेवा. प्रत्येक मतदारसंघात महिला कर्मचारी असलेले स्वतंत्र मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचा-यांद्वारे चालविण्यात येणारे मतदान केंद्र, किमान 2 ते 3 आदर्श मतदान केंद्राची स्थापना करावी. सहायक निवडणूक अधिका-यांनी आपापल्या मतदारसंघातील अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण घ्यावे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे, आदी सुचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.
सदर बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,  नोडल अधिकारी व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. 
चंद्रपुर जिल्ह्यातील मतदारांची संख्या: 5 जानेवारी 2024 च्या अंतिम यादीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 9 लक्ष 12 हजार 483 पुरुष मतदार, 8 लक्ष 69 हजार 788 स्त्री मतदार आणि 45 तृतीयपंथी मतदार असे एकूण 17 लक्ष 82 हजार 316 मतदार आहेत. चंद्रपुर जिल्ह्यायत एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 6778 असून यात 4527 पुरुष दिव्यांग मतदार आणि 2251 स्त्री दिव्यांग मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 2032 मतदान केंद्र आहेत.

Chandrapur district administration on action mode in view of upcoming elections

#Chandrapur-district-administration-On-action-mode-in-view-of-upcoming-elections