ऑनलाईन मतदार नोंदणी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल, संशयास्पद नोंदणी असलेल्या 6853 मतदारांचा यादीमध्ये समावेश नाही, जिल्हाधिका-यांनी दिले कारवाईचे आदेश A complaint has been lodged with the police regarding online voter registration, 6853 voters with suspicious registrations are not included in the list, the Collector has ordered action.

ऑनलाईन मतदार नोंदणी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

संशयास्पद नोंदणी असलेल्या 6853 मतदारांचा यादीमध्ये समावेश नाही

जिल्हाधिका-यांनी दिले कारवाईचे आदेश

चंद्रपूर, दि. 19 ऑक्टोबर : राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने नोंदणी केलेल्या 6853 मतदारांच्या नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला नाही. दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे. 
70-राजुरा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचा निरंतर कार्यक्रम भारत  निवडणूक आयोगाद्वारे सुरू आहे. यापुर्वी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला व राजकीय पक्षाची बैठक घेऊन 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी व 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी राजुरा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आली. 
याअंतर्गत 70- राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणी करीता अर्ज प्राप्त झाले होते. सदर नोंदणी अर्जाची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6853 अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व  रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो  एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले. 
या सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून सदरचे सर्व अर्ज नाकारण्यात आले असून त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. सदरचे सर्व अर्ज हे Voter Helpline App किंवा  NVSP Portal  याद्वारे Online स्वरुपात करण्यात आले होते. वास्तविकपणे वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, नाव कमी करणे, त्यामध्ये बदल करणे याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु या सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे फॉर्म ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
मतदार नोंदणी करीता ऑनलाईन प्राप्त झालेले 6853 अपात्र अर्ज विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नामंजुर करण्यात आले आहेत व अशा अर्जदारांचा मतदार म्हणून मतदार यादीत समावेश करण्यात आला नसल्याचे राजुराचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी कळविले आहे. 
A complaint has been lodged with the police regarding online voter registration, 6853 voters with suspicious registrations are not included in the list, the Collector has ordered action.

#complaint  
#police  
#onlinevoterregistration
#6853 
#voters 
#suspiciousregistrations  
#Collector
#ChandrapurCollector 
#Election