चंद्रपूर तहसील कार्यालयात मशीन तयार करण्याची प्रक्रिया
चंद्रपूर, दि. 10 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामांची लगबग वाढली असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणा-या मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूर मतदारसंघातील 390 मतदान केंद्रासाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे सुरू असून दोन दिवसांत संपूर्ण मशीन सज्ज करण्यात येणार आहे.
विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात 10 आणि 11 नोव्हेंबर या दोन दिवसांत घेण्यात येत आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 936 बॅलेट युनीट, 468 कंट्रोल युनीट आणि 503 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. मशीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे एकूण 30 टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी याप्रमाणे एकूण 90 कर्मचा-यांमार्फत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह मशीन सज्ज करण्यात येत आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 390 मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी 5 टक्के म्हणजे 19 मशीन मॉक पोलकरीता रॅन्डम पध्दतीने निवडण्यात आले. प्रत्येक मशीनवर 1000 याप्रमाणे दोन दिवसांत 19 मशीनवर 19 हजार मॉक पोल घेण्यात येणार आहे.
अशी असते प्रक्रिया : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. यात मतपत्रिका बॅलेट युनीटला लावून सील करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि ईव्हीएम चा डाटा जुळवून बघणे. त्यानंतर कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट सील करून स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येते. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशीनचे वाटप केले जाते.
यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये, रविंद्र भेलावे आदी उपस्थित होते.
Voting machines are getting ready for election
the process of preparing the machine in Chandrapur Tehsil Office
#VotingMachines
#election
#machine
#ChandrapurTehsilOffice
#MaharashtraAssemblyElection2024
#ChandrapurAssembly