१ फेब्रुवारी २०२५ रोजी बोर्ड कार्यालयासमोर निदर्शने
चंद्रपूर : दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती आस्थापनेतील केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक - उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यमंडळ, पुणेचे अध्यक्ष यांच्या दि. १७/०१/२०२५ रोजीच्या पत्रातील मुद्दा क्र. २ नुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना (आस्थापनाव्यतिरिक्त) अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु, सदर निर्णय या ऐन परीक्षांच्या तोंडावर घेतल्याने शाळा, शिक्षकांची तारांबळ उडेल. सोबतच बाहेरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्राच्या भौगोलिक परिस्थितीची, स्थानिक अडचणींची व आवश्यकतेची पूर्ण माहिती नसल्यामुळे परीक्षा व्यवस्थापनात अडथळा निर्माण होईल. एकीकडे शिक्षण विभाग ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान करतो तर दुसरीकडे सदर निर्णयावरून राज्यमंडळाचा राज्यातील शिक्षकांवर अविश्वास दिसतो आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे.
हा निर्णय अनेक अडचणी निर्माण करणारा ठरतो आहे. त्यामुळे सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, राज्य शिक्षक मंडळ, विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्कृती संघटना व इतर समविचारी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.
१ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या धरणे / निदर्शने आंदोलनात नागपूर विभागातील सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय / जिल्हा / महानगर / तालुका पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.
Dharne movement of Bimashi Sangh against that decision
Demonstration in front of Board office on 1st February 2025