मनुर, बोदवड येथे टोमॅटो पीक परिसंवाद:
भारतीय शेतकऱ्यांसाठी टोमॅटोचे नवीन वाण विकसित होणार
कागोमी कंपनीचे ग्लोबल ॲग्री सेंटर प्रमुख वाटारू मात्सुशिता
मनुर, ता. बोदवड, २१ (प्रतिनिधी) – भारतीय शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या टोमॅटोच्या नवीन वाणाच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत, असे प्रतिपादन जपान येथील कागोमी कंपनीचे ग्लोबल ॲग्री सेंटर प्रमुख वाटारू मात्सुशिता यांनी केले. मनुर (ता. बोदवड) येथे प्रगतशील शेतकरी विशाल संतोष खेलवाडे यांच्या शेतावर 'टोमॅटो पीक परिसंवाद' कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
जपान येथील शास्त्रज्ञ मासातोशी इचिकावा, आयुमु ओनोझाटो, भारतातील वरिष्ठ व्यवस्थापक मिलन चौधरी, जैन इरिगेशनच्या करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा, विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, कृषी पर्यवेक्षक नितीन महाजन, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक विशाल भोसले व कागोमी कंपनीचे मनोहर देसले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्तूत टोमॅटो पीक परिसंवाद कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संत गजानन महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रथम जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी शेतकऱ्यांना पिकांची माहिती ठेवण्याचे महत्त्व सांगितले व ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करण्यावर भर दिला. कृषी विभागाचे नितीन महाजन यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. मजुरांच्या टंचाईच्या परिस्थितीमुळे अडचण निर्माण होते. ते अडचण दूर करण्यासाठी टोकण यंत्राचा वापर कसा फायदेशीर ठरतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कांदा लागवडीसाठी टोकण यंत्रावर शासनाकडून ५०% अनुदान मिळते, याचीही माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जैन इरिगेशनचे कांदा व टोमॅटो तज्ज्ञ श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी कागोमी टोमॅटो लागवड केलेला प्लॉट आणि मल्चिंग पेपरचा वापर केलेला प्लॉट यांची पाहणी केली.
कागोमीचे मनोहर देसले यांनी 'कागोमी ०१' या वाणाच्या लागवडीसंबंधी सविस्तर माहिती दिली. या वाणाच्या लागवडीसाठी ५ बाय सव्वा फूट अंतर राखावे व मल्चिंग पेपरचा वापर करावा. पहिला तोडा ८० दिवसांत करता येतो व संपूर्ण हंगामात फक्त २-३ स्प्रे करावे लागतात. एक एकरात 5×1.25 या अंतरावर रोपांची लागवड केली तर 7000 रोपे बसतात. किमान 5 ते 6 किलो एका झाडाला फळे लागली आहे. अंदाजे 35 ते 40 मे.टन उत्पादन सहज मिळू शकते परंतु प्रत्यक्षात 8 ते 10 किलो प्रती झाडावर फळे मिळत आहेत. 'त्यामुळे अंदाजे 50 ते 60 मे टन टोमॅटोचे मिळू शकते असे मिलन चौधरी यांनी सांगितले. कागोमी व जैन इरिगेशन गेल्या चार वर्षांपासून भारतीय शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहेत ही उत्तम बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जपानहून आलेल्या तिघा शास्त्रज्ञांनीदेखील आपले अनुभव व संशोधन शेतकऱ्यांसमोर मांडले. त्यांनी केलेल्या भाषणाचे भाषांतर मिलन चौधरी यांनी केलं होतं.
प्रगतशील शेतकरी रवींद्र खेलवाडे यांनी टोमॅटो व पांढऱ्या कांदा लागवडीचे अनुभव शेअर केले. करार शेती विभाग प्रमुख गौतम देसर्डा यांनी मल्चिंग तंत्रज्ञान व आधुनिक शेतीसंबंधी मार्गदर्शन केले. गौतम देसर्डा यांनी रब्बी टोमॅटो, हमी भाव योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरते याचे आर्थिक गणित मांडले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कागोमी जपानची सबसिडियरी कंपनी युनायटेड जेनेटिक्स नवीन टोमॅटो वाण विकसित करण्यासाठी आपण कार्यरत असल्याची माहिती टोमॅटो ब्रीडर विनोद कुमार यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्रसिंग सोळुंकी यांनी केले, तर श्रीराम पाटील यांनी आभार मानले.
Tomato Crop Seminar at Manur, Bodwad:
New tomato varieties will be developed for Indian farmers
Kagomi Company Global Agri Center Head Wataru Matsushita