चिमुर येथे पत संस्था संचालक व सेवकाचे दोन दिवसीय सहकारी प्रशिक्षण संपन्न Two-day cooperative training for credit institution directors and employees completed at Chimur

चिमुर येथे पत संस्था संचालक व सेवकाचे दोन दिवसीय सहकारी प्रशिक्षण संपन्न

#Loktantra Ki Awaaz 
चिमूर : चिमुर-महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे सहकारी शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर जिल्हा उपनिबंधक चंद्रपुर व उपनिबंधक सहकारी संस्था चिमुर च्या वतीने चिमुर तालुक्यातील पतसंस्था संचालक, कर्मचारी, अधिकारी यांचे दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण संपन्न झाले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे निमित्ताने चिमुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी संस्थेच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय सहकार प्रशिक्षणाचे उ‌द्घाटन पत्रकार श्रीहरी सातपुते यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर सहकार प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य भारत फलके, जिजाऊ नागरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ खंडसिंगे, राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष गुरुदास ठाकरे आदि मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सहकार शिक्षण व प्रशिक्षणा‌द्वारे संचालक व कर्मचारी यांच्या माध्यमातुन सहकार चळवळ गतिमान होत आहे. अश्या प्रकारच्या अनेक प्रशिक्षणात गेल्या पंधरा वर्षापासुन आपण सहभागी होत असल्याचे मत पत्रकार श्रीहरी सातपुते यांनी व्यक्त केले. उ‌द्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदास ठाकरे यांनी सदर प्रशिक्षण हे राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी संस्थेत आयोजित केल्याबद्दल आयोजकाचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी नचीकेत शहाने, रामभाऊ खडसिंगे यांनी मार्गदर्शन केले.
दोन दिवसीय प्रशिक्षण पत संस्था संचालक व सेवकांना सहकारी कायदा तरतुदी, आयकर कायदा, पतसंस्था नियमक मंडळ, एन.पी.ए. व्यवस्थापन, संस्थेच्या विविध सभा व सभेचे महत्व, संचालकाचे अधिकार व कर्तव्य, कार्यपद्धती, के. वाय.सी., कर्जवाटप व वसुली, कर्मचारी सेवाशर्ती, कर्जदारांचा विमा, आवर्ती ठेव, सुरक्षा ठेव, बचत खाते, नफ्याचे विनियोग नोंदी,कार्यालयीन व्यवस्थापन व कार्यालयीन दस्ताऐवज आदी विविध विषयांवर उपप्राचार्य भारत फलके व अन्य तज्ञानी मार्गदर्शन केले.

सरकार कायदेशिर सल्लगार अॅड. स्वेता जयस्वाल यांनी सहकार कायदा व कायद्यातील तरतुदी, कायद्यातील पळवाटा व त्यावरील उपाय, कर्ज वसुली, न्यायालयीन कार्यपद्धती अशा विविध विषयावर सविस्तर व समाधानकारक मार्गदर्शन कले.

समारोपीय कार्यक्रमाचे मंचावर सहकार प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य भारत फलके, राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी संस्थेचे संचालक तथा पत्रकार सुरेश डांगे उपस्थित होते. संस्थेची प्रगती व विकास करण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्रातील स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक संचालक व कर्मचाऱ्यांनी अध्यावत राहणे आवश्यक असल्याचे मत सुरेश डांगे यांनी आपल्या भाषणातील व्यक्त केले.

या प्रसंगी रत्नमाला नागरी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक अश्विनी करकाडे, यशस्वी नागरी सह. पतसंस्थेच्या व्यवस्थापक क्षमा शंभरकर, महिला नागरी सह. संस्थेचे व्यवस्थापक संदिप पझोणे, जिजाऊ नागरी सह. संस्थेचे व्यवस्थापक मिलींद जांभुळे यांनी आपल्या मनोगतातुन प्रशिक्षणातील माहिती व प्रशिक्षकांची शिक्षण पद्धती याबाबत समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह. संस्थेचे वसुली अधिकारी तेजराम लांडे यांनी आभार मानले. प्रशिक्षणाला सुमारे साठ संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
Two-day cooperative training for credit institution directors and employees completed at Chimur