🌱 पीक विमा दरांचा तातडीने फेरविचार करा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी
#Loktantra Ki Awaaz
मुंबई, 11 जुलै : खरीप हंगाम २०२६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेले पीक विमा दर शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक असल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सविस्तर निवेदन देऊन चंद्रपूर जिल्ह्याच्या पीक विमा दरांचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, चंद्रपूरचा भौगोलिक परिसर, हवामान, पर्जन्यमान आणि पीकपद्धती शेजारील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसारखीच असतानाही चंद्रपूरसाठी पीक विमा हप्ता अवाजवी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीडनाशके, मशागत, सिंचन आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. त्यातच वाढीव पीक विमा हप्ता भरावा लागत असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ किंवा कीडरोगामुळे नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही, अशी चिंता मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचा पीक विमा दर शेजारील जिल्ह्यांप्रमाणे वाजवी पातळीवर आणावा, कृषी विभाग व विमा कंपनीची तातडीने बैठक घेऊन विसंगती दूर करावी आणि सुधारित दर निश्चित होईपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
👉🏻 जिल्हानिहाय मोठी तफावत
🔶भात: चंद्रपूर ₹1,300; गडचिरोली ₹512,
गोंदिया ₹60, भंडारा ₹575, नागपूर ₹65
🔶 कापूस: चंद्रपूर ₹1,300; गडचिरोली ₹590, नागपूर ₹65, वर्धा ₹65
🔶 सोयाबीन: चंद्रपूर ₹1,250; वर्धा ₹65
शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमध्ये अनेक
पटींनी अधिक पीक विमा हप्ता आकारला जात असल्याने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करून चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली आहे.
Crop insurance injustice to Chandrapur farmers? Urgently reconsider crop insurance rates; MLA Sudhir Mungantiwar's demand to the Chief Minister and Agriculture Minister
#CropinsuranceinjusticetoChandrapurfarmers?
#Urgentlyreconsidercropinsurancerates
#MLASudhirMungantiwar'sdemandtotheChiefMinisterandAgricultureMinister
