🔊 डीजे बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, १० जुलै : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये आठव्या आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपाणी होते.
बैठकीस चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकनूरी नरेश , अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चोगुले, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तीकार, डीजे चालक-मालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सवादरम्यान सुरक्षा आणि समन्वयावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक गणेश मंडळाने स्थानिक स्तरावर समन्वय समिती स्थापन करून स्वयंसेवकांची नियुक्ती करावी तसेच मंडप परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था उभारावी, अशा सूचना देण्यात आल्या.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहनांवर लहान मुलांना बसवू नये, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित 'आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत' उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी श्री गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात डीजे वाजविण्यावर पूर्णपणे बंदी राहणार असून सर्वोच्च न्यायालय व शासनाच्या ध्वनीप्रदूषण नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. डीजे चालक-मालक, गणेश मंडळे आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
जिल्हा प्रशासन आणि चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सवासाठी आवश्यक सर्व तयारी सुरू केली असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
#ChandrapurGaneshUtsav2026
#GaneshUtsav
#DJ
#Ganpati
