🔶 165 नवीन मतदान केंद्र निर्माण करण्याचे प्रस्ताव प्राप्त
🔶 जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक
चंद्रपूर, दि.20 जुलै : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 1200 पेक्षा जास्त मतदार असलेल्या 331 मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. तसेच नव्याने एकूण 165 नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी 20 जून 2026 पासून एसआयआर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत गृहभेटी देऊन सर्व मतदारांकडून गणना पत्रक (इन्युम्युरेशन फॉर्म) भरून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. याच कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1200 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करणे, तेथे नवीन मतदान केंद्र तयार करणे, आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांच्या नावात बदल करणे आणि मतदारांच्या सोयीच्यादृष्टीने मतदान केंद्र इतरत्र स्थलांतरित करण्याचे प्रस्ताव निवडणूक आयोगास 29 जुलै 2026 पूर्वी मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.20) जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना, सुसूत्रीकरणाची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच त्यांना नव्याने प्रस्तावित मतदान केंद्रांच्या नावांची परिपूर्ण सूची (यादी) व आवश्यक ती सर्व माहिती अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गोळा होणारा डेटा आणि सांख्यिकीय निष्कर्ष हे शुद्ध व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठीचे मुख्य आधार आहेत. या संपूर्ण पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 8 ऑगस्ट 2026 रोजी एकत्रितरीत्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून प्रस्तावित मतदान केंद्र सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाल्यानंतर, हे सर्व स्वीकृत बदल आणि मतदार पुनरीक्षणाचे अंतिम निष्कर्ष एकत्रितरीत्या प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये लागू (अंमलात) केले जातील. त्याच आधारे नवीन मतदान केंद्रांची पुनर्रचना व रचना कायदेशीररित्या अस्तित्वात येईल.
सदर नोटीस 20 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या सूचना फलकावर सर्वसामान्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले.
Coordination of 331 polling stations in Chandrapur district under SIR campaign
#Coordinationof331pollingStations linChandrapurdistrictunderSIRcampaign
#SIR
#SIRChandrapurCoordination of 331 #pollingstationsiChandrapurdistric
#SIRcampaign
