🦽 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकवर्गणीतून दिली नवीन तीनचाकी सायकल; रोजीरोटीला मिळाला पुन्हा आधार
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, 10 जुलै : माणुसकी अजूनही जिवंत असल्याची प्रचिती देणारी घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. महाकाली मंदिर परिसरात वास्तव्यास असलेले दिव्यांग दाम्पत्य भास्कर सातपुते व चंदा सातपुते यांचा उदरनिर्वाह अगरबत्ती विक्रीवर अवलंबून आहे. तीनचाकी सायकलवर फिरून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सायकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती पूर्णपणे निकामी झाली आणि त्यांच्या रोजीरोटीवरच संकट ओढवले.
ही बाब जलसंपदा विभाग, चंद्रपूर येथे कार्यरत गणेश गेडेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने लोकप्रतिनिधींकडून नवीन तीनचाकी सायकल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, काही तांत्रिक व कागदपत्रांच्या अडचणींमुळे ते शक्य झाले नाही.
यावर हार न मानता गेडेकर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांशी चर्चा केली. सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वेच्छेने आर्थिक योगदान दिले आणि त्या निधीतून नवीन तीनचाकी सायकल खरेदी करून सातपुते दाम्पत्याला भेट दिली. या मदतीमुळे त्यांच्या रोजगाराला पुन्हा गती मिळाली असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.
नवीन तीनचाकी सायकल सुपूर्द करण्याचा कार्यक्रम विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था, नागपूर शाखा चंद्रपूरचे पालक संचालक गणेश गेडेकर, निसर्ग पर्यावरण व मानवता विकास संस्थेच्या चंद्रपूर तालुका अध्यक्षा सौ. जयश्री सोनुले, कार्यवाहक प्रा. गजानन सोनुले, मोरेश्वर रूडे व विजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या समाजोपयोगी उपक्रमासाठी पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र वऱ्हाडे, उपविभागीय अभियंता योगेश जामकर, तसेच सलमान खान पठाण, नरेंद्र मेश्राम, सृजन अघम, वैभव बोरकर आणि सहाय्यक अभियंता श्रेणी-२ कु. पूनम जीवतोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जपलेली ही भावना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गरजूंच्या मदतीला धावून जाणारी ही माणुसकीच समाजाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी आहे.
A unique gift of humanity from the Water Resources Department for a disabled couple with seven children, officers and employees donated a new three-wheeler through public donations; livelihood support was provided again
