➡️ हॉटेलचे फक्त किचन, किराणा दुकान सुरू राहतील
➡️ जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही
➡️ घरातच राहणे हाच सर्वोत्तम उपाय
➡️ कॉटन जिनिंग व्यवसाय सुरू राहणार
➡️ शहराच्या मोठ्या मैदानात भाजीबाजार घेण्याचा विचार
➡️ शिवभोजन योजना सुरू करणार
➡️ असाह्य नागरिकांनी मनपाच्या कम्युनिटी किचनचा लाभ घ्यावा
➡️ लवकरच घरपोच किराणा सुरू करण्याची व्यवस्था
➡️ जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात मिळतील
➡️ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रमुखांनी द्यावे ओळखपत्र
चंद्रपूर, दि. 26 मार्च : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वानी घरीच रहावे यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.तथापि, 14 एप्रिल व त्यानंतरही गरज पडल्यास दीर्घ काळाच्या खानपान व्यवस्थेसाठी प्रशासन प्रयत्नरत असल्याचे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली अन्नधान्य,इंधनाबाबत साठा व वितरण विषयक बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहिते, सहाय्यक जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एन.बी निंबाळकर तसेच जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनेचे अधिकारी, मेडिकल असोशिएशन, पेट्रोल वितरक, ऑईल व गॅस कंपनीचे प्रतिनिधी, किराणा असोशिएशन, हॉटेलचे मालक,प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. होम कॉरेन्टाईन करण्यात आलेल्यांची संख्या 54 आहे. 14 दिवस होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्यांची संख्या 51 आहे. नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी 7 नमुने पाठविण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू नये,यासाठी हॉटेलमधील जेवणावळी पूर्णपणे बंद केल्या आहेत. परंतु, या हॉटेल्समध्ये किचन सुरू राहील. जेवणाची व्यवस्था राहणार नाही. तसेच खानपानाची दुकाने उघडी राहतील मात्र रस्त्यावर उभे राहून किंवा त्या ठिकाणी खान-पान करता येणार नाही. पार्सल सुविधा फक्त उपलब्ध राहतील. आपल्या नजीकच्या किराणा दुकानांमध्ये आपल्या नजीकच्या हॉटेलमध्ये पायी जाऊनच आवश्यकतेनुसार व फारच गरज असल्यास त्याचा वापर करावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. शक्यतो घरातील एखादाच नागरिक अशा कामांसाठी बाहेर पडल्यास उत्तम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेला पुन्हा सुरू करण्यात आले असून यावेळी नागरिकांना शिवभोजन केंद्रात जेवण मिळणार नाही तर महानगर पालिके मार्फत या पार्सलचे वितरण होणार आहे. शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा.कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे.
जिल्ह्यातील ज्या आस्थापनावरील कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून काम करत आहेत. त्यांना त्या आस्थापनांची ओळखपत्र देण्यात यावेत. दर्शनी भागात आपले ओळखपत्र घेऊन पोलिसांना दाखवावे. पोलिस विनाकारण कोणावर कारवाई करणार नाही. आतापर्यंत 39 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारण नसताना बाहेर फिरणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात येईल,असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी दिलेल्या वेळेनुसार दुकाने उघडा व दुकाने बंद करा. नागरिकांचा परस्परांशी कमीत कमी संबंध येणे. यासाठी आपण हा लॉकडाऊन पाळत असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये लवकरच शहराच्या मोठ्या मैदानात भाजीबाजार घेण्याचा विचार सुरू आहे. तसेच नागरिकांना किराणा होम डिलिव्हरी करण्याची यंत्रणा सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
कॉटन जिनिंग व्यवसायालाही आज सूट देण्यात आली आहे. हॉटेलचे किचन सकाळी व रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील. तसेच, सर्व नागरिकांनी आपल्या अगदी जवळच्या दुकानातूनच जीवनावश्यक वस्तूची खरेदी करावी, वस्तू खरेदी करण्यासाठी वाहन वापरता येणार नाही.
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सुधारित आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु,पेट्रोलपंप धारकांनी पेट्रोल पंपवर एका वेळेस 2 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत. तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचा भंग झाल्यास संबंधित पेट्रोलपंप धारक व ग्राहक यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी निर्देश दिले आहे.