कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाची सक्त पाऊले गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन चंद्रपूरमध्ये जिल्हा सनियंत्रण कक्षांची सुरुवात

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाची सक्त पाऊले
गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन
✨चंद्रपूरमध्ये जिल्हा सनियंत्रण कक्षांची सुरुवात
✨ जिल्ह्यात नवे ८ विदेशी नागरिक निरीक्षणाखाली
✨२४ तास वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी मदतीसाठी तैनात
✨ 31 मार्च पर्यंत ताडोबा पर्यटन स्थळ बंद
✨ एकही रुग्ण पॉझिटिव नाही ;घरातच राहणे करावे पसंत
✨ शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांनी येण्याचे टाळावे
✨ सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे आवाहन
✨ आनंदवन बंद करण्याचे निर्देश ;भेटी बंद
✨ सुरु असलेल्या कोचिंग क्लासेसवर कारवाई करणार
✨ तहसील पातळीवरही कोरेन्टाईन केंद्र
✨ मराई पाटण गंगा मातेची यात्रा स्थगित
चंद्रपूर दि. १७ मार्च : कोरोना प्रतिबंधासाठी पुढची दोन आठवडे अतिशय महत्वपूर्ण असून आवश्यकता असेलच तरच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती द्यावी. अन्यथा परस्परांपासून अलिप्त घरातच राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 31 तारखेपर्यंत नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी गरज पडल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. याठिकाणी आता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची 24तास तैनाती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढचे दोन आठवडे प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे असे आव्हान जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी आज केले आहे.
       संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे या परिस्थितीत जवळपास सर्व शासकीय, शैक्षणिक खासगी संस्था बंद करण्यात आलेल्या आहे. यामागे नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी असून याला सुटी न समजता कुठेही न फिरता घरीच राहणे आवश्यक आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असून या काळात सर्वांनी सुजाण नागरिक म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
       नागरिकांनी या परिस्थितीत कोणताही अपमान पसरविता शांततेने प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यामध्ये हे कोरुना संदर्भात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे जिल्हा संनियंत्रण कक्ष उघडण्यात आले असून याठिकाणी तीन शिफ्टमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे हे सर्व अधिकारी कोरोना संदर्भात वैद्यकीय उपचार करण्यासाठी प्रशिक्षित असून ०७१७२-२०७६६९ या क्रमांकावर उपलब्ध आहे गरज वाटल्यास या ठिकाणावरून मार्गदर्शन घ्यावे असे आवाहनही जील्हाधिकार्‍यांनी केले आहे.
      दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार कालपासून जिल्ह्यामध्ये आठ विदेशी नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे सौदी अरेबिया मधील 2 दुबई चे पाच व अमेरिका इथून आलेल्या एका नागरिकाचा यामध्ये समावेश आहे या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे तथापि त्यांना केवळ निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.
    आज जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे वरोरा येथील आनंदवन देखील आता अभ्यासकांसाठी व बाहेरील व्यक्ती साठी बंद करण्यात आले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यांनी देखील ही बाब लक्षात घ्यावी असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे काही ठिकाणी बंदीचे आदेश दिल्यानंतरही कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे आढळून आले असून अशा कोचिंग क्लासेस वर कारवाई केली जाईल असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आल्या असून चित्रपटगृहे देखील बंद केलेली आहे जीवनावश्यक वस्तू शिवाय पुढील काळामध्ये सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद करण्यात यावे असे निर्देश देखील देण्यात आले आहे.
ताडोबा राहणार 31 मार्च पर्यंत बंद:
राज्यात कोरोना 19 या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलत गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय योजना केली आहे. या मधीलच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 31 मार्च पर्यंत पर्यटकांना प्रवेश नसणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी परिपत्रक जारी करून राज्यातील पर्यटन बंद ठेवण्याचा आदेश काढलेला आहे.
या आदेशामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा ही समावेश आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत ताडोबा बंद असणार आहे अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील विविध यात्रा रद्द
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा मधील प्रसिद्ध महाकाली यात्रा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याचप्रमाणे, जिवती तालुक्यांमधील प्रसिद्ध असलेल्या मराई पाटण येथे गंगा मातेची यात्रा सुरू होती.याठिकाणी विविध राज्यातील व जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने भाविक येतात महिनाभर चालणारी यात्रा 16 मार्चला जिल्हाधिकार्यांंच्या आदेशानंतर स्थगित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत जिल्ह्यातील गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व देवस्थान,धार्मिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे 31 मार्च पर्यंत बंद राहतील. देवस्थान मंदिराचे दैनंदिन विधी सुरू असणार आहेत. परंतु, बाहेरील व्यक्तींना मंदिरात प्रवेशासाठी बंदी असणार आहे.

शैक्षणिक संस्था,महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद

जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच सर्व महाविद्यालय त्याचप्रमाणे सर्व वसतीगृह कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत बंद असणार आहे. परंतु, शैक्षणिक संस्थेतील  महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमितरित्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत आयोजित केलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व तहसील पातळीवर स्थापन होणार कॉरेंटाईन केंद्र 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व तहसील यांनी आपल्या क्षेत्रात एक कॉरेंटाईन  ठिकाण करण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

प्रशासकीय कार्यालयातील अभ्यांगतांच्या भेटी रद्द
प्रशासकीय कार्यालयातील भेट देणाऱ्या सर्व अभ्यांगतांच्या भेटी 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व कार्यालय प्रमुख जास्तीत जास्त कार्यालयीन कामकाज ई-मेल, दूरध्वनी व इतर तत्सम मार्गांनी करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्याही कारणाने कार्यालयात व त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दी जमणार नाही. यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

उपाययोजना बरोबरच जनजागृती 
कोरोना (कोविड-19) या विषाणूंच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपाययोजना व जनजागृती राबवित आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनता वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ती सर्व संबंधितांना वितरीत करण्यात आले आहे.

कोरोना नियंत्रण कक्ष

सर्व सामान्य नागरिकांसाठी टोल फ्री 104 क्रमांक कोरोना विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन(020-26127394)करण्यात आला असून तो सकाळी 8 ते  रात्री 10 या कालावधीत कार्यरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी  नागरीकांनी अधिक माहितीसाठी 07172-26122 या संपर्क क्रमांकाचा वापर करता येणार आहे.

 निवडणुकांचे कामकाज स्थगित :

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता अशावेळी निवडणुका घेणे उचित होणार नाही. या निवडणुका निर्भय,मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग सद्या सुरू असलेले सर्व कार्यक्रम स्थगित करीत आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज (प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक) दिनांक 17 मार्च 2020 रोजी ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे.अशी माहिती राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नसल्याचे जिल्हा उप निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांनी स्पष्ट केले आहे.